छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजलगाव येथील नेते अशोक डक यांना भाजपच्या प्रवेशापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) प्रयत्न सुरू झाले आहेत. c

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायक कार्यालयातूनही डक यांना रविवारी सकाळीच फोन आल्याची माहिती आहे. डक यांनीही त्याला दुजोरा दिला. पक्षाच्या मराठवाड्यातील अनेक नेत्यांकडूनही डक यांना फोन गेल्याचे समजते. मात्र, डक हे भाजप प्रवेशावर ठाम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली असून, येत्या दोन-तीन दिवसांतही ते मुंबईत काही नेत्यांच्या भेटी-गाठी करणार असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: त्यांच्या पक्षांतर्गत राजकीय विरोधकांकडूनही भाजपमधील प्रवेशाला आडकाठी आणण्यासाठी हालचाली गतिमान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. डक यांचा संभाव्य भाजपतील प्रवेश हा मराठवाड्यात आणि त्यातही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्याचे ‘लक्ष्य’ ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का ठरणारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आणि त्यांच्याच पाठबळाने मुंबई बाजार समितीचे सभापतिपद अशोक डक यांना मिळाले होते. सध्या ते मुंबई बाजार समितीचे व पुणे येथील राज्य बाजार समिती महासंघाचेही संचालक आहेत. भाजपलाही डक यांच्या रुपाने माजलगावमध्ये एक चेहरा हवा आहे. डक यांचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी राजकीय मतभेद असून, डक-सोळंके घराण्यात यापूर्वीच्या पिढीपासून वाद आहे. भाजपही माजलगावात नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.