|| सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारीआलिशान डेक्कन ओडिसी ही गाडी गेल्या दीड वर्षापासून बंदच असल्याने तिची पुन्हा देखभाल दुरुस्ती करावी लागत असून माटुंगा येथील रेल्वेच्या कार्यशाळेत ती सुरू आहे. करोनापूर्वीच कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज या कंपनीचा बोजवारा उडाला. कंपनीच्या गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी सुरू आहे. या कंपनीबरोबरचा करार संपल्यानंतर नव्याने डेक्कन ओडिसी चालविण्यासाठी तीन वेळा जागतिक स्तरावरील निविदा काढण्यात आल्या. त्याला प्रतिसाद मिळाला असल्याने  जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निविदेच्या वित्तीय व तांत्रिक तपासणी पूर्ण होतील, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळास बुधवारी ४७ वर्षे पूर्ण होत असताना पर्यटनाला मोठा फटका बसला असून त्याचे मोठे परिणाम सध्या दिसून येत आहेत.

डेक्कन ओडिसीचे ६० लाखापर्यंतचे तिकीट भारतीय पर्यटकांना तसे परवडणारे नव्हतेच. विदेशी पर्यटकांची ही रेल्वे गाडी चालविणाऱ्या कंपनीने या व्यवसायात तोटाच झाला असल्याचे मत लेखी स्वरूपात नोंदविले होते. पुढे ही कंपनीच बुडाली. आता तर या कंपनीच्या गैरव्यवहाराचीही चौकशी सुरू झाली आहे. मात्र, ही गाडी सुरूच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून तीन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ५०० कोटी रुपयांची उलाढाल आणि २०० कोटी रुपयांचा नफा असणाऱ्या कंपन्यांनीच निविदा प्रक्रियांमध्ये सहभाग नोंदवावा अशी अट असल्याने चांगल्या कंपन्या ही रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी येतील अशी अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे.

करोना लाट संपल्यानंतर ‘ रिव्हेंज टुरिझम’ ही संकल्पना पुन्हा प्रत्यक्षात येईल असा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा तयारी केली जात आहे. सध्या डेक्कन ओडिसी रेल्वेची देखभाल दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. पण करोनाकाळात पर्यटनाला कमालीची गळती लागली आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे २३ ‘रिसॉर्ट’ सुनसान आहेत. पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटन निवास ओस पडले आहेत. औरंगाबाद येथील पर्यटन निवासातील खोल्यांमध्ये या वर्षी लाट ओसरल्यानंतर केवळ १७ टक्के खोल्यांमध्येच पर्यटक थांबले. औरंगाबाद शहरातील पर्यटन महामंडळातील ८४ पैकी ५४ निवासव्यवस्थेतील दालनांपैकी बहुतांश दालने रिकामी आहेत. र्अंजठा  व वेरुळ येथेही अशीच स्थिती असल्याने  या वर्षी सारे चक्रच थांबले आहे. औरंगाबाद येथे करोनाकाळात पश्चिम बंगालमधील पर्यटक वाढले होते. पण थेट विमानसेवा नसल्याने यामध्ये अडचणी आहेत. दरम्यान पर्यटनाला फटका बसलेला असताना  डेक्कन ओडिसी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आता पुन्हा जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे बंद करण्यात आल्याने करोना लाट ओसरण्याची पर्यटन विश्व वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New movement to start deccan odyssey akp
First published on: 20-01-2022 at 00:05 IST