छत्रपती संभाजीनगर : नवजात अर्भक मृत घोषित केल्याचा प्रकार अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला. दोन दिवसांपूर्वीची घटना ही बुधवारी समोर आली असली तरी त्यांच्या मुलाबाबत हा प्रकार घडला त्यांच्याकडून अद्यापही तक्रार दाखल झाली नसल्याने प्रकरण ठाण्यापर्यंत पोहोचले नाही.

मात्र, याप्रकरणावर ‘स्वारातीशावैमरु’चे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. राजेश कचरे यांनी सांगितले की, रुग्णालयाने स्वत:हून (सुमोटो) चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला असून, दोन समित्या नियुक्त केल्या आहेत. होळ येथील एक महिला २७ आठवड्यांच्या गर्भाच्या संदर्भात तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झालेली होती. त्यादरम्यान, तिच्या गर्भाशयाची पिशवी फुटल्याचे निदान समोर आले. अन्य तपासण्यांमध्ये तिच्या गर्भातील अर्भक जिवंत असल्याची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. गर्भपात करण्याविषयी त्यांच्यामध्ये विचार सुरू होता. पुढे ७ जुलै रोजी संबंधित महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसूतीमध्ये संबंधित अर्भक ९०० ग्रॅम वजनाचे जन्मले. त्यावेळीही त्याची कुठलीही हालचाल दिसत नव्हती. त्याला रात्रभर काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. सकाळी ते बालक त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. होळ येथे गेल्यानंतर त्यांच्या घरातील एका ज्येष्ठ महिलेला नवजात बालकाच्या हालचाली जाणवल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. संबंधित बालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची प्राथमिक चौकशीत बालक जिवंत असून, नेमका काय प्रकार घडला, याची चौकशी सुरू आहे, असे डाॅ. कचरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापूर्वी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यावरूनही रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या प्रकरणाचीही चौकशी झाली होती. त्या दरम्यान, औषधी पुरवठा करणाऱ्या काही कंपन्याच अस्तित्वात नसल्याचीही बाब पुढे आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत घोषित करण्याच्या प्रकरणात मुळात संबंधित महिलेची प्रसूती ही २७ आठवड्यातच झालेली आहे. साधारण २८ आठवड्यांनंतरची प्रसूती मानली जाते आणि बाळाचे वजनही ३ किलोपर्यंत असते. पण या महिलेचे बाळ हे केवळ ९०० ग्रॅम वजनाचे आहे. म्हणजे एक किलो वजनाचेही नाही. मृत घोषित करण्याचा प्रकार बऱ्याचवेळा घडू शकतो. वैद्यकीय परिभाषेत ‘सस्पेंडेड अनिमेशन’मध्ये तसे घडू शकते. बऱ्याचवेळेला नवजात अर्भकाचे अवयव विकसित झालेले नसतात (गर्भाचा प्रीमॅच्यूअर प्रकार). त्यामुळे त्याचे हृदयाचे ठाेके आदी कळू शकत नाहीत. संबंधित बाळाबाबतही तसेच घडले. घरी जाईपर्यंत काही अवयव विकसित झाले असू शकतात, हे समजून घेतले पाहिजे. आपण सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहोत.- डाॅ. शंकर धपाटे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय.