पैसे भरल्यानंतर पुन्हा जोडणी
औरंगाबाद महापालिकेकडे वीज वितरण कंपनीची सुमारे १४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील प्रशासकीय इमारतीची १४ लाख ९० हजार व सिद्धार्थ उद्यानाची २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याने येथील वीज बुधवारी तोडण्यात आली. वारंवार नोटिसा देऊनही महापालिकेकडून रक्कम भरली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिकेकडे पाणीपुरवठा, पथदिवे यासह सुमारे १४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पाणीपुरवठय़ाच्या थकबाकीच्या रकमेबाबत वाद असले तरी अन्य देयकेही दिली जात नसल्याने वीज वितरण कंपनीने वीज तोडण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या या निर्णयामुळे महापालिकेची पुरती बदनामी झाली आहे. आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या महापालिकेला वीजदेयक भरणेही शक्य नसल्याने ही कारवाई करण्यात आली. मनपा मुख्यालयाने दुपारी १४ लाख रुपयांचा भरणा केल्याने पुन्हा ५ वाजण्याच्या सुमारास वीज सुरू करण्यात आली. सिद्धार्थ उद्यानाचे वीजदेयक मात्र अजून भरण्यात आले नाही. पाणीपुरवठा व पथदिव्यांचे देयकही मोठे असल्याचा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे.
धामणगाव येथे वीज पडून दोन ठार, तीन जखमी
हिंगोली : वसमत तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडून दोन जण ठार झाले, तर तिघे जण जखमी झाले. धामणगाव येथे शेतात हे सर्व जण काम करत होते. पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यालगत झाडाखाली थांबले असता वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जण जखमी असून त्यांना उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रामराव तुकाराम कान्हेरकर (वय २४) व नितीन प्रकाश खंदारे (वय ३५)अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर कमी-अधिक जोरात पाऊस पडत होता. वसमत तालुक्यातील धामणगाव येथील बेले यांच्या शेतात काम चालू असताना दुपारी १च्या सुमारास जोराचा पाऊस सुरू झाल्याने शेतातील पाच जण रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली थांबले होते. वीज पडल्याने दोघे ठार झाले, तर सदाशिव पांडोजी बेले (वय ३५), रवि भागवान खंदारे (वय ३५), चांदूजी दत्तराव बोखारे (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना सुरुवातीला वसमत येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील औषधोपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले. वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाखांची आíथक मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले. या घटनेप्रकरणी कुरुंदा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.