खासदार जलील यांच्याविरोधातील याचिकेवर खंडपीठाचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या विरोधात दाखल याचिकेवरील सुनावणीत राज्य निवडणूक आयोगासह सर्व उमेदवारांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर चार आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे.

खासदार जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारात दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असा प्रचार करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. बहुजन महापार्टी या पक्षाचे पराभूत उमेदवार शेख नदीन शेख करीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, इम्तियाज जलील निवडणूक लढवीत असलेल्या एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण होईल, अशी भाषणे निवडणूक प्रचारादरम्यान केली. आपल्या म्हणण्यापुष्टयर्थ त्यांनी काही चलचित्रफिती सादर केल्या. त्यांनी प्रार्थनास्थळांमधूनही प्रचार केला आणि त्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली. त्यांनी धर्म आणि जातींच्या नावावर मते मागितली. इम्तियाज जलील यांनी निवडणुकीदरम्यान ८२ हजार रुपये रोख खर्च केला. निवडणूक नियम ८७ नुसार निवडणुकीचा खर्च करण्यासाठी स्वतंत्र खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडून त्यातूनच सारा खर्च धनादेशाद्वारे करावा लागतो.

याशिवाय एका अल्पवयीन मुलगा सय्यद मोहम्मद अली हाशमी याची चलचित्रफीत आफताब खान याने तयार करून ती मतदानाआधी समाज माध्यमावर प्रसारित केली. तो एआयएमआयएमचा कार्यकर्ता आहे. या चलचित्रफितीमध्ये एआयएमआयएमला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

याशिवाय धार्मिक तेढ निर्माण होईल अशी विधाने करण्यात आली होती. याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच पराभूत उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to all candidates in aurangabad lok sabha constituency zws
First published on: 27-07-2019 at 04:26 IST