कापसाची सव्वा दोन कोटी पाकिटे उपलब्ध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : सोयाबीन बियाणांची कमतरता नाही. साडेदहा लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागते. गावागावात कोणत्या शेतकऱ्याकडे घरगुती बियाणे आहेत, याची यादी करण्यात आली आहे. उगवण क्षमताही तपासण्यात येत आहे. कापूर बियाणांचा कोणताही तुटवडा नाही. साधारणत: दीड कोटी कापूस पाकिटे लागतात. मात्र, राज्यात सध्या सव्वा दोन कोटी पाकिटे उपलब्ध असल्याची माहिती कृषी संचालक सुहास दिवसे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. या वर्षी खरीप हंगामात पीक रचनेत तसा कोणताही बदल करणे तातडीने शक्यत होणार नाही, असेही ते म्हणाले. खाद्यतेलासंदर्भात बहुतांशी राज्य आयातीवर अवलंबून असले तरी कृषीक्षेत्रातील बदल तातडीने करता येणार नाहीत. बियाणे आणि खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी यंत्रणा पूर्णत: तयार ठेवली जात असल्याचेही ते म्हणाले.

राज्य बियाणे कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मुळे म्हणाले की, कापूस बियाणांची पाकिटे तयार करुन ती दुकानापर्यंत पोहचविण्याचे काम सध्या सुरू आहे. कामगारांची कमतरता आणि वाहतुकीच्या सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. मात्र, पाऊस आठ दहा दिवस लवकर आला तर थोडीशी धावपळ होईल. मात्र, पेरणीपर्यंत अडचणी येणार नाहीत. सोयाबीन बियाणांची कमतरता आहे. मात्र, घरगुती बियाणे वापरावेत, असा सल्ला दिला जात आहे. तो अमलात आल्यास फारशी अडचण येणार नाही.

जालना हे बियाणे क्षेत्रातील उद्योगासाठीचे महत्त्वपूर्ण ठाणे मानले जाते. विविध बियाणे कंपन्या या भागात आहेत. या कपंन्यांचे असोसिएशनचे सचिव रितेश मिश्रा म्हणाले, करोनामुळे १५ दिवसापूर्वी बियाणे पुरविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, त्या  केंद्र आणि राज्य सरकारने सोडविल्या. बियाणांचा तुटवडा भासणार नसला तरी आयात खतांचा तुटवडा भासू शकतो, असे कृषी विभागातील कर्मचारी सांगतात.

या खरीप हंगामात तेलबियांची पेरणी वाढविण्याची गरज होती. मात्र, तसे होण्याची शक्यता कमीच आहे. सोयाबीनसह तेलाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कारण अनेक रिफायनरींमध्ये सध्या मजुरांचा तुटवडा भासतो आहे. तसेच खाद्यतेल आयातीवरही परिणाम होणार असल्याने या क्षेत्रात बदल करण्याची गरज असली तरी खरीप हंगामात ती होण्याची शक्यता नाही. दरम्यान कापूस हा एकमेव टिकून राहणारा माल असल्याने तो अधिक घेण्याकडे कल असेल, असेच चित्र दिसून येत आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over two crore cotton bags available in aurangabad district zws
First published on: 16-05-2020 at 00:56 IST