छत्रपती संभाजीनगर : वाद्यातून होणारी महाराष्ट्राची ओळख जरी ढोलकीची असली तरी राज्यात ताल धरला जातोय तो तबल्याचा. केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभर आता तबला शिकण्याचे प्रमाण वाढतच आहे. गावोगावी आता तबला शिकणारी मुले वाढत आहेत. पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्याच ५० हून अधिक शिष्यांचे गुरुकुल आहेत. महाराष्ट्राचा ताल आता अधिक शास्त्रीय होत आहे.
पंडित तळवलकर म्हणतात, ‘ढोलकी हे लोकवाद्य. त्याला खूप मर्यादा. पण तबल्याची प्रतिष्ठाही मोठी आणि ती जपली जाते आहे. तबल्यात एक प्रकारचे काव्य आहे. त्यात इतकी विविधता आहे की आता पाश्चत्त्य संगीत प्रेमींना, संगीतकारांना तबल्या विषयी आकर्षण निर्माण झाले आहे.’
छत्रपती संभाजीनगर येथे पद्म महोत्सवात गुरुवारी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता ‘लोकसत्ता’ शी बोलताना ते म्हणाले, लय-ताल वाद्याचा पहिला मान पखवाज-मृदंगाचा. मृदंगापासून तयार झाला तबला. मृदंग हा पंजांनी तर तबला बोटांनी वाजवला जातो. त्यामुळे तबल्यातून अक्षरस्वरांची निर्मिती झाली. ही क्रांती म्हणता येईल. अक्षरस्वरांमुळे ध्वनी उत्पन्न झाले. वेगवेगळया ध्वनींमुळे अक्षरांनी संबोधले. अक्षरातून झाला शब्द. शब्दातून झाले वाक्य. वाक्यातून झाली रचना. रचनेतून झाली बंदिश. बंदिशीचे इतके प्रकार, विविधता झाली की, बंदिशींचा अगणित विस्तार झाला. असं अगणित भांडार तबल्यातून तयार झाले. हे भांडार वेगवेगळया प्रांतातील कलावंतांनी वाटून घेतले. त्यातून तयार झाली घराणी. आज तबल्यामध्ये सहा घराणी आहेत. घराण्यांमधून तयार झाली शैली, असे सांगत पं. तळवलकर यांनी घराण्यांचाही विस्तृत पट मांडला.
ते पुढे म्हणाले, घराणी ही मूल्यसापेक्ष असतात. तर शैली ही व्यक्तीसापेक्ष असते. त्यामुळे शैलीतून कलाकार उजळतो. वेगवेगळ्या कलावंतांच्या वाद्यवादन प्रकाराचे संयुग (कॉम्बिनेशन) करून स्वतःची एक शैली निर्माण करतो. त्याला घराण्यांचाही एक आधार असतो. दोन-तीन घराण्यांचा एक विचारधारा उत्पन्न होत असते. त्याला शैली म्हणतात. त्यामुळे हे लय-तालाचे वाद्य पखवाजानंतरचे, पण मागून येऊन तिखट झाले.
का तिखट झालं ? असा प्रश्न करून पं. तळवलकर स्वतःच उत्तर देताना सांगतात की, तबला हे धृपदासोबत संगीत करू शकते. तबला हेच ख्याल – संगीत, तंतू वाद्य, वेगवेगळ्या वाद्यांसह सिनेसंगीत, भावगीत, लावणी, ठुमरी अशा सर्व संगीत प्रकाराला साथसंगत करते. कारण या प्रत्येक गाण्याला किंवा सांगीतिक प्रकाराला एक अर्थ आहे. जशी गंभीर गायकी, ख्यालासारखी तरल अमूर्त गायकी आहे, ठुमरी किंवा उपशास्त्रीय संगीत जे भावस्पर्शी आहे, त्यालाही समर्थतेने साथ करते. किंबहुना नृत्य प्रकारालाही तबला हे साथ करते. त्यामुळे तबला हे वाद्य फार पुढे गेले.
तबला वादनात अनेक दिग्गज कलावंत मंडळी होऊन गेली. उस्ताद अहमदजां तेरखवाँ, उस्ताद हुसेन खाँ, पं. शांताप्रसाद, पं. अनोखेलालजी, पं. किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ साहाब, उस्ताद झाकीर हुसैन, अशी अनेक रथी-महारथी मंडळी झाली. उस्ताद झाकीर हुसैन यांनी जगतात तबला वाद्याला प्रसिद्धी मिळवून दिली.
बालगंधर्वांच्या काळात उस्ताद अहमदखाँ तेरखवाँयांनी तबल्याचे स्वतंत्र सोलो वादन केले. शिवाय गुरुस्थानावरून शिकवणाऱ्या अनेक गुरुजींनी तबल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यात माझे गुरुजी पं. नाणिजकर, त्यांचे गुरुजी उस्ताद अमीर हुसेन खाँ साहाब यांनी दर्जात्मक स्तरावर तबल्याला पोहोचवण्याचे काम केल्याचे पं. तळवलकर सांगतात. तो तबला आता वाढतो आहे. राज्यात तो अगदी गावागावात रुजतो आहे.
