छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणे एका दुचाकीस्वार तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. तर छेडछाडीच्या संदर्भातील चित्रफित समाजमाध्यमात पसरवणारा दुसरा तरुणही अडकला. तरुणीजवळून जाताना दुचाकीतून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तरुणाचा शोध घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याच्यावर समाजमाध्यमावरून माफी मागण्याची वेळ आली.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या परिसरातील साॅल्ट हाॅटेलसमोर छेडछाडीचा प्रकार घडला होता. यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या टोल-फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्यानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. शेख समीर शेख सलीम (वय १९), असे दुचाकीवरून छेड काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्यासंदर्भातील चित्रफित समाजमाध्यमावर पसरवणाऱ्या तरुणाचे नाव सय्यद इजाज सय्यद मुख्तार (रा. सिडको) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एमजीएम कॉलेज परिसरात काही दिवसांपासून एक नशेखोर मुलगा विना क्रमांकाच्या दुचाकीवरून कर्णकर्कश आवाजाचे ध्वनीप्रदूषण करुन सार्वजनीक रहदारीस अडथळा निर्माण करत मुलींसमोरून त्यांना घाबरवण्याच्या उद्देशाने जात असल्याचे निदर्शनास आले. शिवाय मुलींकडे बघून अश्लिल हावभावही करत असल्याचे समोर आले असून, या घटनेचे गुप्त पद्धतीने चित्रीकरणही केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित केली जात होती आणि त्या चित्रफितींना पाहणाऱ्यांची संख्या दीड लाखांवर असल्याचीही माहिती समोर आली. या प्रकाराची माहिती व चित्रफिती दामिनी पथकातील कल्पना राघोजी खरात यांना दाखवण्यात आल्या. त्यांना मुलींकडून संबंधित दोन्ही तरुणांविषयीची माहिती मिळाल्यानंतर शेख समीर शेख सलीम याच्या समाजमाध्यम खात्यावरून पडताळणीही करण्यात आली. त्यानंतर दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक आयफोन, एक दुचाकी, छायाचित्रणाचा कॅमेरा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव, पोलीस अमंलदार रवींद्र देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.