एमआयएमची इशारावजा तिरकी चाल

औरंगाबाद : मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवे असे सारे म्हणतात. पण त्यासाठी कोणी काही करत नाही. ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य सरकारने मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षण दिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून माघार घेऊ, असे सांगत एमआयएमकडून आखणी एक तिरकस चाल आखण्यात आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आरक्षण प्रश्नी पत्र लिहिले असून या प्रश्नी आंदोलनही तीव्र केले जाईल, असे सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

२०१४ मध्ये विधानसभेत मंजूर केलेल्या पाच टक्के आरक्षण पुन्हा कायम करावे, मराठा आरक्षण मागणीच्या धर्तीवर मुस्लीम समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वतंत्र कायदा मंजूर करावा, वक्फच्या जमिनीवरील अतिक्रमणे तसेच त्याच्या खरेदी विक्रीतील घोळ घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले आहे. मुंबईतील मेळाव्यानंतर आरक्षण मागणीला आणखी टोकदार करण्याची भूमिका एमआयएमकडून हाती घेतली जात आहे. वक्फचा कारभार केवळ २६ जणांवर सुरू असून येथे ३०० जणांची भरती करावी, अशी मागणीही खासदार जलील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.