दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर यामुळे लातूर शहरातील हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या ७ वर्षांपासून शहरात आठवडय़ातून एकदा हवेतील प्रदूषणाचे मोजमाप केले जाते.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सहकार्याने राष्ट्रीय हवा गुणवत्ता नियंत्रण प्रकल्प राबवला जातो. भालचंद्र रक्तपेढीच्या इमारतीवर, केशवराज विद्यालयाच्या इमारतीवर व एमआयडीसी रस्त्यावर पाण्याच्या टाकीवर हवेचे प्रदूषण मोजण्याची यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. आठवडय़ातून एकदा एका ठिकाणी ४८ तास सलग नोंद घेतली जाते व या नोंदीचा अहवाल प्रदूषण मंडळाकडे पाठवला जातो.
आरएसपीएम (श्वसनास अडथळा आणणारे कण), एसपीएम (धुळीचे कण), ऑक्सिडंट ऑफ नायट्रोजन व सल्फर डायऑक्साइड या चार बाबी प्रामुख्याने तपासल्या जातात. सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण आपल्याकडे प्रमाणापेक्षा कमी आहे. कमी औद्योगिक वसाहत असल्यामुळे हे प्रमाण कमी आहे. आरएसपीएम व एसपीएम या दोन्हींचे प्रमाणही धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे. शहरातील गंजगोलाई, बसस्थानक, निवासी भाग असलेला श्यामनगर परिसर व एमआयडीसी रस्ता या सर्वच ठिकाणी श्वसनाला अडथळा आणणारे बारीक कण हवेत मोठय़ा प्रमाणावर आहेत. ८० मायक्रोग्रामपेक्षा हे प्रमाण कमी असायला हवे. प्रत्यक्षात सर्वच ठिकाणी हे १२० पेक्षा अधिक आहे.
धुळीच्या कणांचे प्रमाण सर्वच ठिकाणी २०० पेक्षा अधिक आहे. शहरात पक्के रस्ते दिसत असले, तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कच्चे रस्ते आहेत व त्यावरून वाहने जात असल्यामुळे धूळ मोठय़ा प्रमाणावर उडते. धुळीचे कण वाढल्यामुळे अस्थमासारख्या आजाराचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होतो. प्रदूषणाचे प्रमाण दरवर्षी वेगाने वाढत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याची माहिती प्राचार्य जे. एस. दरगड व प्रा. अण्णाराव चौगुले यांनी दिली.
गेल्या ७ वर्षांत वाहनांचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक झाले. वाहनात वापरले जाणारे इंधन योग्य गुणवत्तेचे नसेल, तर त्यामुळेही प्रदूषण वाढते. सीएनजीची सोय नाही व एलपीजीची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांचा वापर कमीत कमी व्हायला हवा. लातुरात शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे दुचाकी वाहने असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वेगाने वाढते आहे.
शहरात फिरताना तोंडाला मास्क लावणे अथवा कपडा बांधून जाणे अनिवार्य बनले आहे. सामान्य नागरिकांना या गंभीर बाबीची तीव्रता जाणवत नसते. प्रदूषणामुळे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात, हे डॉक्टरांनी सांगितल्यावरच संबंधित व्यक्ती काळजी घेते अन्यथा नागरिक उपाययोजना न करताच वावरत असतात. शाळा-महाविद्यालयांत वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करून यावर दीर्घकालीन उपायोजना करताना व्यक्ती, समाज याची जबाबदारी नेमकी काय आहे, हे समजावून सांगितले पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा निर्माण केला गेला व त्यानुसार अंमलबजावणी झाली तरच प्रदूषण कमी होईल अन्यथा प्रदूषणामुळे होणारे परिणाम भोगण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धुळी प्रदूषणात अव्वल
हवेच्या प्रदूषणात दिल्लीनंतर कानपूर या मोठय़ा शहराबरोबरच सोलापूरचा समावेश आहे. सोलापुरात धुळीचे प्रमाण देशातील १० अव्वल शहरातील आहे. सोलापूर व लातूर हे अंतर कमी आहे. हवामान सारखे आहे. धुळीचे प्रमाण त्यामुळे लातुरातही सोलापूरच्या खालोखाल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution latur noticed
First published on: 16-12-2015 at 03:29 IST