हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे नांदेडसह लातूर व हिंगोली या तीन जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे विधान परिषद सदस्या तथा हिंगोलीतील प्रमुख नेत्या डाॅ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यासह जिल्ह्यातील पाचपैकी चार तालुकाध्यक्ष, अन्य प्रमुख पदाधिकारी नेत्यांनीही पाठ फिरवल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आमदार डाॅ. सातव यांनी मराठवाड्यातील कुठल्याच बैठकीला हजेरी लावलेली नाही.

मराठवाड्यात नांदेडपूर्वी संभाजीनगर व जालन्यातही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षातील आढावा बैठका पार पडल्या आहेत. या ठिकाणच्या बैठकांनाही डाॅ. सातव उपस्थित नव्हत्या, अशी माहिती या निमित्ताने पुढे आली. नांदेडच्या बैठकीत हिंगोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश सराफ यांना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी चांगलेच फटकारल्याची माहितीही बाहेर आली.

सराफ यांना हिंगोली जिल्ह्यातील पक्षाच्या एकूण परिस्थितीवर विचारलेल्या मुद्द्यावर माहिती देता न आल्याने प्रदेशाध्यक्षांनी त्यांना सुनावले. सर्व माहिती घ्या, दोन पावले पुढे काय अन् चार पावले मागे काय, हे सांगू नका. त्यावर पटापट निर्णय घ्या, अशा स्पष्ट सूचना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ यांना दिल्या.

हिंगोलीत पक्षाचे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतीमध्ये किती सदस्य आहेत, यासह किती ठिकाणी बूथ समित्या स्थापन केल्या, हे सराफ यांना सांगता आले नसल्याची माहिती असून, त्यावरूनच प्रदेशाध्यक्षांनी सराफ यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. सराफ यांना जिल्ह्यातील सर्व याद्या तपासून पाहा, अशा सूचना देऊन हेव्यादाव्यांचा विषय का सांगितला जातो, असा सवालही प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित केला. सर्वांना सामावून घ्या, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत त्यांचे कुठे चुकत असेल, तर दुरुस्त करून घ्या, अशा प्रदेशाध्यक्षांच्या सूचनांवर सराफ यांनी सर्व आदेशांचे पालन केले जाईल, असे सांगितल्याची माहिती पुढे आली.

या बैठकीस माजी तालुकाध्यक्ष विनायक देशमुख, श्याम जगतापांसह चार तालुकाध्यक्ष गैरहजर होते. तर गजानन देशमुख, अनिल नेनवानी, बापूराव पाटील यांच्यासह काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड येथील महत्त्वाच्या आढावा बैठकीस आमदार प्रज्ञा सातव हजर नव्हत्या हे सत्य आहे. पण त्यामागचे कारण आपल्याला माहिती नाही. त्या विषयी डाॅ. सातवच बोलू शकतील. मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालनासह इतर ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत ज्या काही महत्त्वाच्या बैठका झाल्या तेथेही आमदार सातव गैरहजर होत्या. त्यांचा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तेवढा संवाद नसतो. – अब्दुल हाफिस, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष