आरोग्य विमा योजनेवर तोगडियांकडून प्रश्नचिन्ह

देशाचे आरोग्य अतिदक्षता विभागात दाखल आहे. सरकारी आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत. इमारत आहे तर यंत्रसामग्री नाही. यंत्र असेल तर ते चालू नाही. केंद्र सरकारने आरोग्य विमा देण्याची जाहीर केलेली योजना योग्य असली तरी त्यासाठी लागणारा विम्याचा हप्ता कोठून आणणार, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना केलाआहे. गावामध्ये शेतकरी मरतो आणि सीमारेषेवर जवान मरतो आहे, तेव्हा पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. आरोग्य विम्यासाठी किमान ५० हजार कोटी रुपये लागतील, ते कोठून आणणार आहात, हे अर्थमंत्री जेटली यांनी सांगावे, असे म्हणत तोगडिया यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

गेल्या तीन दिवसांपासून तोगडिया मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आहेत. याअंतर्गत औरंगाबाद येथे पत्रकार बठकीत ते बोलत होते.

तोगडिया म्हणाले, की देशाचे आरोग्य अतिदक्षता विभागात आले आहे. देशात प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक जण रुग्ण आहे. त्यांचा एकूण आरोग्यावरचा खर्च १४ लाख कोटी रुपये एवढा होतो आहे. जसजशी लोकसंख्या वाढेल तसतशी त्यात भर पडत जाईल. त्यामुळे आरोग्य सेवेवर अधिक रक्कम खर्च करणे गरजेचे आहे. सध्या भारताचा आरोग्य क्षेत्रातील खर्च बांगलादेश आणि नेपाळपेक्षाही कमी आहे. अलिकडेच केंद्र सरकारने नवी विमा योजना आणली आहे. ते चांगले आहे. पण जी संख्या विमा मंजूर करण्यासाठी ठरविण्यात आली आहे, त्याला किमान ५० हजार कोटी रुपये लागतील. ही रक्कम अर्थमंत्री जेटली कोठून आणणार आहेत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.