माजी मंत्री पंकजा मुंडेंवरही टीका

औरंगाबाद :  राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आपण आता मराठवाडय़ाच्या सिंचनाशी संबंधित प्रश्नात लक्ष घालणार असल्याचे येथे स्पष्ट करताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अलीकडेच केलेल्या आंदोलनाची खिल्ली उडवली. पाच वर्षे मंत्री होतात तेव्हा काय केले, अशा शब्दांत टीका करताना चव्हाण यांनी मराठवाडय़ाला मिळणारे पाणी, अनुशेषासह नदी जोड प्रकल्पाच्या कामात विभागाचा सुपुत्र या नात्याने लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले. येत्या काही दिवसात वैधानिक मंडळाची बठकही घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद ते सिंदखेडराजा, अशी पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने गुरुवारी काढण्यात आली. या यात्रेचा शुभारंभ बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, राज्याचे अध्यक्ष विलास औताडे, मंगलसिंग सोळुंके आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.

मंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले,की मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर पंकजा मुंडे या आंदोलन करत आहेत, असे ऐकण्यात आल्यानंतर आश्चर्य वाटले. त्या पाच वर्षे मंत्री होत्या. या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी, ‘देर आये, दुरुस्त आये’ म्हणत मुंडे यांनी हाती घेतलेला प्रश्न आपणही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. सत्तेच्या माध्यमातूून मराठवाडय़ातील सिंचनाचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना मंत्री चव्हाण म्हणाले, आरएसएस आणि बीजेपी हा समाजातील एक कर्करोग आहे. त्यापासून रोखण्याचे आव्हान सेवादलाच्या माध्यमातून पेलण्यात येणार आहे. काँग्रेसची एक मजबूत शाखा म्हणून सेवा दलाकडे पाहिले जात असून त्या माध्यमातून गावपातळीवर विविध योजना पोहोचतात की नाही, यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या वेळी आमदार अमर राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, केशवराव औताडे आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसला मनपात सत्तेचा वाटा मिळावा

काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी काँग्रेस राज्यात जशी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेली आहे त्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेच्या सत्तेत काँग्रेसला वाटा मिळावा, अशी मागणी केली. सेवादलाच्या ७५ कि.मी.च्या पदयात्रेत स्वातंत्र्यसैनिक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना पाच हजार रुपयांची मदत, स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही औताडे यांनी सांगितले.

निधी खर्च होण्यावर काँग्रेसचे लक्ष

गावपातळीवर सरकारच्या विविध योजना, निधी पोहोचतो की नाही, यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे. कुठे सरकारच्या योजना, निधी गरिबांपर्यंत पोहोचण्यात अडथळा येतो आहे, याची माहिती घ्यावी. मराठवाडय़ातील जिल्ह्यंना अडीचशे कोटींचा निधी देण्यात येणार असून त्याच्या विनियोगावर काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.