केंद्र सरकारच्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी नदीबाबतही शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय जलसंधारणमंत्री उमा भारती यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नोकरशाही अपेक्षित काम करीत नाही वा करू देत नाही, अशी कबुली देताना त्यामुळेच नोकरशाहीवर फार विसंबून राहण्यापेक्षा आहे त्या व्यवस्थेत बदल करण्याचे सूतोवाचही त्यांनी या वेळी केले.
राष्ट्रीय जलमिशन, जलसंधारण, नदीविकास आणि गंगासंवर्धन मंत्रालयाच्या वतीने येथील वाल्मी संस्थेत पश्चिम विभागीय पाणीवापर संस्थांच्या अध्यक्षांचे दोन दिवसांचे संमेलन पार पडले. संमेलनात उमा भारती यांचे भाषण झाले. राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष जी. एस. झा, केंद्रीय जलसंधारण विभागाचे सचिव अमरजितसिंह, राज्याचे सचिव एस. एम. उपासे यांच्यासह मध्य प्रदेश, झारखंड, गोवा आदी ठिकाणच्या पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गंगा शुद्धीकरण प्रकल्प हा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यामुळे गरज भासल्यास सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) हे काम करणार आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. देशातील सध्या अपूर्ण असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. त्यानंतरच नवीन प्रकल्प सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजधानी दिल्लीत लवकरच जलमंथन व जलक्रांती अभियान घेण्यात येणार आहे. यात सर्व राज्यांच्या पाणीवापर समित्यांना सहभागी करून घेण्यात येईल. सत्ताधारी भाजपमध्ये कृषी क्षेत्राशी जवळून संबंध असणारे कमीच असल्याची कबुली देताना आपला या क्षेत्रातील व्यासंग पाहून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वाजपेयी सरकारच्या राजवटीत आपणाकडे कृषी खात्याची जबाबदारी आवर्जून सोपवली होती, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर स्तुतिसुमने उधळली. सरकारचा कारभार चांगला चालला असून, पठाणकोट हल्ला, असहिष्णुता, एफटीआयआय संस्थेत गजेंद्र चौहान यांची नेमणूक आदी बाबींवर विरोधक सरकारला बदनाम करीत असल्याची टीका त्यांनी केली. अभिनेता आमीर खान याने देशात असहिष्णुता वाढली असल्याचे सांगून देश सोडण्याचा पत्नीचा विचार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून देशभर गदारोळ उठला. मात्र, प्रेक्षकांचे मनोरंजन हे कलाकाराचे काम आहे. त्यामुळे कलाकाराने राजकीय वक्तव्ये करू नयेत. त्यापेक्षा निवडणूक लढवून राजकीय प्रवाहात त्यांनी सामील व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा आजही कृषी क्षेत्रातून मोठय़ा संख्येने रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाण्याचे नेमके नियोजन करण्याची गरज राज्यमंत्री शिवतारे यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईचे स्वरूप पाहता शहरात पाण्याचा पुनर्वापर होण्याची गरज आहे. केंद्राने या दृष्टीने पावले उचलावीत, अशी सूचना त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
गंगा नदीच्या धर्तीवर गोदावरीचेही शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री उमा भारती यांची ग्वाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-01-2016 at 03:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purification of godavari on the lines of the ganga river