छत्रपती संभाजीनगर : परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि गेल्या दीड वर्षापासून जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीवरील स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठवली. धाराशिव जिल्ह्यातील निधीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाले होते. हा निधी थांबवण्यासाठी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला होता. २०२३-२४ मधील २६८ कोटी रुपयांचा निधी अडकून पडला होता. या वर्षीच्या निधीतून रक्कम न मिळाल्याने विकासकामे ठप्पच होती.

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही आमदार नाही. जिल्ह्यात आमदार नसल्यामुळे निधीबाबतच्या गोंधळात अजित पवार यांनी फारसे लक्ष घातले नव्हते. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे निधीची स्थिगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीत कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती निधी द्यायचा याचे सूत्र ठरल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘सध्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा कोणी आमदार नसला, तरी तेथील कार्यकर्त्यांना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यासाठी म्हणून निधी मंजूर केला आहे. विकासकामांसाठीचा हा निधी कोणत्या पक्षाला किती द्यायचा, याचे सूत्र आता ठरले असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच धाराशिव जिल्ह्यात फार निधी मिळणार नाही. पण अडचण येणार नाही, याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.

राहुल मोटे यांना प्रवेश देताना जिल्हा वार्षिक निधीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. धाराशिव जिल्ह्यात शरद पवार यांच्या गटातील राहुल मोटे यांनी पक्षांतर करून अजित पवार यांच्या गटात प्रवेश घेतला. या मतदारसंघातील साखर कारखाना, तसेच अन्य अनेक विकासकामांसाठी मंत्रालयात कोणास भेटायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. तो आता सुटला आहे.