जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांची टीका

ठेकेदारांना फक्त ‘लाभ’ कळतो, ‘शुभ’ नाही. आपल्याकडे ठेकेदारच योजना देतात आणि त्यानुसार सरकार काम करते. आम्ही अकराशे जोहड बांधले; पण यातील एकाही जोहडचे बांधकाम ठेकेदाराने केले नाही. लोकशाही लोकांची राहत नाही तोवर विकास होणार नाही. सध्याची लोकशाही ठेकेदारधार्जणिी असल्याची टीका प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी केली. उसाच्या शेतीचा मोह सोडावा, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सभागृहात डॉ. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत विभागीय जलपरिषद पार पडली. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त राहुल रेखावार, माजी आमदार पाशा पटेल, जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, कृषिभूषण कांतराव देशमुख, सोपानराव अवचार, डॉ. विवेक नावंदर, प्रवीण देशमुख, डॉ. राजगोपाल कालाणी आदी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले, की मराठवाडय़ात आजही उसाच्या शेतीचा सोस मोठय़ा प्रमाणावर आहे. पीकपद्धती निसर्गाच्या चक्रासोबत जोडली जात नाही, तोवर दुष्काळ कायम राहणार आहे. शेती व निसर्गाच्या जपवणुकीचे पारंपरिक समजूतदारपणावर आधारित असेही शास्त्र आहे. याचा आधार घेत जुने शेतकरी वर्षांच्या हवामानाचा अंदाज घेऊन कोणती पिके घ्यायची आणि कोणती टाळायची याचा निर्णय घेत. आता हवामान खात्याचे सगळेच अंदाज खोटे ठरतात. शेतकरी केवळ अन्नदाता नसून तो सृष्टीचा रक्षणकर्ता आहे.

परभणीला ‘पाणीदार’ करण्यासाठी त्यांनी या वेळी काही उपाय सुचवले. नद्या प्रवाहित करा, वाळूउपशावर र्निबध घाला, प्रवाहासोबत वाहून येणारी माती तलावात जाणार नाही याची काळजी घ्या, पाणी उपलब्धतेचा विचार करून पिकांचा निर्णय घ्या, सरासरीच्या निम्म्याहून अधिक पाऊस पडूनही मराठवाडय़ात दुष्काळ का याचा विचार करा, दुष्काळ केवळ निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. नसíगक साधनसंपत्तीची अमानुष लूट केल्यामुळेच ही वेळ आली. धरतीचे पोषण करण्याऐवजी आपण शोषण केले. त्यामुळेच विकास रुजला नाही, असेही डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले. अवर्षणाच्या तडाख्यातून सावरलेल्या राजस्थानच्या भूमीची यशोगाथा या वेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी उलगडली.

कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी जलसंधारणाचे महत्त्व सांगून पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी महिवाल यांनी जिल्ह्यात जलयुक्तची कामे मोठय़ा प्रमाणात होत असून त्याचे परिणाम भविष्यात निश्चित दिसून येतील, असे सांगितले.

जिल्ह्यत गोदावरी पात्रात सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाकडेही त्यांनी लक्ष वेधले. आयोजक डॉ. राहुल पाटील यांनी परिषदेच्या माध्यमातून परभणी जलसमृद्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. आपल्या संकल्पनेतून साकारलेल्या िपगळगढ नाल्याच्या कामाची माहिती त्यांनी दिली. अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनील मोडक यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण देशमुख यांनी आभार मानले.