प्रत्येक धर्माचा आदर करावा. निंदा, द्वेष, परपिडा करणाऱ्यांसाठीही क्षमाभाव ठेवावा. श्रद्धेने नव्हे तर प्रज्ञेच्या कसोटीवर अभ्यासलेला बौद्ध धम्म असून प्रज्ञेने झालेले अनुयायीच धम्माचा आधार आहेत. तीन हजार वर्षांपूर्वी याच भारतभूमीतून जगाला अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना जागतिक पातळीवर ‘एशियाचा प्रकाश’ म्हटले जाते. धम्माचा अर्थ ग्रहण आणि पाचन या प्रक्रियेत सामावलेला असून भूक-तहान, परिवर्तन व संस्कार या तीन प्रकारच्या दुखांचा विस्तृतपणे उलगडा करून दाखवत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी तीन दुखे ग्रहण करून ती पचवली तरच भवचक्रातून मुक्ती मिळेल, अशा शब्दांत उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले.

येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जागतिक धम्म परिषदेच्या समारोपाच्या दिवशी रविवारी सकाळच्या सत्रात ते बोलत होते. मंचावर श्रीलंकेतील सर्वोच्च भिक्खू महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिद्धी यांच्यासह म्यानमार, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, थायलंड, बांगलादेश व भारतातील विविध राज्यातून आलेले भिक्खू उपस्थित होते.

दलाई लामा म्हणाले, ‘‘भूक-तहान हे दुख विसरण्यासाठी बौद्ध धम्म ग्रंथात दहा प्रकारचे सत्यकर्म सांगितली आहेत. ती आचरणात आणावीत. यातून तुम्हाला हे दुख पचवण्याचा मार्ग सापडेल. परिवर्तन म्हणजे ही एक आंतरिक बाब असून राग, काम, लोभ या दुखावर नियंत्रण मिळवून त्याला नष्ट करावे लागते. त्यातून तुम्ही समाधी अवस्थेकडे वाटचाल करत जातात. समाधीचेही काही प्रकार आहेत. संस्कार दुख हे जन्माजन्मापासून चिटकलेले असते. स्वततील अविद्या नष्ट करणे म्हणजे जे बाहेर दिसते ते खोटे अर्थात माया असून याची ओळख झाली तरच माणूस भवचक्रातून मुक्ती प्राप्त करू शकेल.’’

प्रत्येकाने बुद्ध होण्याचा प्रयत्न करावा, असे सांगत लामा यांनी बुद्ध होणे म्हणजे काय, याचाही उलगडा करून सांगितला. व्यक्तीतील क्लेश-राग, लोभ-मोह नष्ट करणे. अहंकार नष्ट करून चित्तशुद्धी करणे म्हणजे बुद्ध होणे असून चार आर्यसत्य समजून घ्यायला हवेत. त्यात सम्यक व परमार्थ हे पहिले दोन आर्यसत्य आहेत. अहिंसेच्या अभ्यासातूनच आपण आपला अहंकार नष्ट करायला हवा. घमेंड असेल तर आपण दुसऱ्यालाही श्रेष्ठ मानायला शिकणार नाहीत. त्यामुळे सर्वाविषयी आदर, प्रेम, दया, करुणा भाव जपत वागावे, असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.

लामा पुढे म्हणाले, ‘‘२० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतात बौद्ध धम्माची पुनस्र्थापना झाली असून २१ व्या शतकात तुम्हाला आंतरिक क्लेश नष्ट करून शांतीसाठी बुद्ध व्हावे लागेल. बुद्धांनी मी मार्गदाता आहे, पण निर्वाणदाता नाही, असे सांगितले असून त्यासाठी स्वअध्यनातूनच माणूस निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो. नालंदाची परंपरा गहण असून त्यावर आता वैज्ञानिकही चिंतन करत आहेत. आपल्यालाही शिकण्याची गरज असून बौद्ध धम्माच्या आचरण पद्धतीचे ग्रंथांमध्ये बंदिस्त झालेले ज्ञान भाषांतरित करून संकेतस्थळाच्या माध्यातून उपासकांसाठी खुले करून देण्याची गरज असल्याचेही लामा यांनी सांगितले.