शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर चिडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिलेला राजीनामा परत घेत असल्याचे पत्र शनिवारी दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत घातली असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत, त्यात शिवसेनेच्या नेत्यांना काही करण्यासारखे राहिले नाही. मात्र, भविष्यात शिवसेना वाढीसाठी राजीनामा देऊ नये असे ठाकरे यांनी सांगितल्याने राजीनामा परत घेण्याबाबतचा पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार जरी युतीचे असले तरी कन्नड मतदारसंघातील कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला होता. राजीनामा परत घेण्याबाबतची संधी देऊ, असे तेव्हा बागडे यांनी सांगितले होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे घाईत निर्णय घेऊ नका, असे कळविले. भाजपकडे खऱ्या अर्थाने सत्तेच्या चाव्या असल्या तरी त्यातून मार्ग काढू, असे सांगितले आहे. येणाऱ्या कालावधीत शिवसेना वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्तालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रारही त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर केली. त्यावर कन्नड मतदारसंघातील कामे रखडण्यामागच्या कारणांचा आढावा घेऊ व कामे मार्गी लावू, असे पाटील यांनी सांगितले. औरंगाबाद- कन्नड रस्त्याचे काम नक्की कोणत्या खात्याकडे यावरच वाद होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्याने त्यांनी दिलेल्या अनामत रकमेतून निविदा काढल्या जातात. दोन दिवसांपूर्वी या रस्त्याची निविदा उघडली असली तरी केवळ एकाच कंत्राटदाराने ती भरल्याने नियमानुसार पुन्हा निविदा काढू, असे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिले. मात्र, एखाद्या मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदारांना राजीनामा द्यावे असे वाटणेच चिंताजनक असल्याने त्यांची गंभीर दखल घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.