छत्रपती संभाजीनगर : सालारजंग यांच्या मूळ मालकीची छत्रपती संभाजीनगर बागशेरजंग दाऊदपूर येथील तीन एकर जमीन माजी मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या वाहनचालक जावेद रसूल शेख यांस बक्षीसपत्र म्हणून देण्यात आली. असे करताना ज्या वकिलांनी ही जमीन पूर्वी घेतली होती, त्यांना भुमरे यांच्या नावाने धमकावले असल्याचा आरोप मुजाहिद खान यांनी केला असून, तशी तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीचा तपास आर्थिक गुन्हा शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
या प्रकरणात भुमरे यांचे वाहनचालक यांनी काही कागदपत्रे सादर करावीत, अशा सूचना दिल्या असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शिघ्रगणक दरानुसार (रेडीरेकनर) या जमिनीची किंमत १५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.
शहरातील दाऊदपूर येथील बागशेर भागातील जमिनीचा फेर चेनमल पन्नालाला कोठारी यांच्या व त्यांच्या वारसाच्या नावे आहे. जमिनीवर सालारजंगचे वारस म्हणून मीर महेमूद अलीखान व अन्य जणांचा दावा आहे. या प्रकरणात मीर महेमूद यांनी पैसे नसल्याने वकील मुजाहिद इकबाल खान यांच्याकडून रक्कम घेऊन काही जमीन स्वत:च्या नावे करून घेण्याचे खरेदीखत केले. तसे करार मदार केल्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षकांकडे या प्रकरणातील दावे दाखल केले. नंतर बक्षीसपत्र तथा हिबानामा करताना मीर मेहमूद यांना वकिलांनी सात लाख रुपये दिले.
बक्षीसपत्राची जमीन पाहण्यासाठी गेल्यानंतर मंत्री भुमरे यांचे वाहनचालक जावेद रसुल शेख यांनी ही जमीन भुमरे साहेबांनी विकत घेतली आहे. इकडे फिरकूही नको, या जमिनीच्या भानगडीत पडू नको अन्यथा तुझीही कबर खणू, असे धमकावल्याची तक्रार वकील मुजाहिद इकबाल यांनी पोलिसांमध्ये केली. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा घडला आहे का, हे तपासले जाईल, असे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. दरम्यान, पैठणचे आमदार विलास संदीपान भुमरे यांच्याशी या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जावेद रसुल शेख हा आमच्याकडे वाहनचालक आहे. पण गाडी चालविण्यापलीकडे त्याने त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात काय करावे, हे माझ्या हातात नाही. या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही.’
फिर्यादी वकील मुजाहिद यांनी मात्र, या प्रकरणात आमदार विलास भुमरे यांची भेट घेतली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नाही, असे आमदार भुमरे म्हणाले. जावेद रसूल यांच्या ६ फेब्रुवारी २०२३ रोजी हे बक्षीसपत्र करण्यात आले. त्याला हिबानामा असे म्हटले जाते.
या प्रकरणी पूर्वीही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही, असे फिर्यादी मुजाहिद खान यांचा आरोप आहे. आता या तक्रारीचा तपास करण्यासाठी वाहनचालकास काही विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आली आहेत. तसेच फिर्यादीकडूनही अधिकचे तपशील मिळवले जात आहेत. अद्याप या प्रकरणात गुन्हा घडला आहे काय, याबाबत कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत, असे पोलीस निरीक्षक संभाजी पवार म्हणाले.