दुष्काळी स्थितीमुळे मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या वर्षी तब्बल १ हजार २२८ गाव-वाडय़ांना टंचाईची झळ बसली असून सर्वाधिक ८५० टँकरने लोकांची तहान भागवली जात आहे. पुढील महिन्यात टँकरची संख्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ६ वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तीन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईनंतर या वर्षी भीषण स्थिती ओढवली आहे. २०१०मध्ये १३४ गावे, १४८ वाडय़ांना १६० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. २०११ मध्ये ४७, २०१२ मध्ये २९४, २०१३ मध्ये ५८२, २०१४ मध्ये २६०, तर २०१५ मध्ये ५१७ टँकरने गाव-वाडय़ांना पाणी पुरविले जात होते.
आजवर तहानलेल्या गाव-वाडय़ांनी हजाराचा टप्पा ओलांडला नव्हता. यंदा मात्र पाणीटंचाईची तीव्रता मोठय़ा प्रमाणावर जाणवत असून ६५३ गावे, ५७५ वाडय़ांमध्ये ८५० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता अधिक आहे. परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टँकरवरच त्यांची मदार आहे. १ हजार ९५७ खेपा पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक गावांमधून टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत. मागील ६ वर्षांतील ही भीषण पाणीटंचाई म्हणून समोर येत आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ासाठी ६६५ गावांतील ९४१ विहिरी व िवधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. शहरी भागात तीन ठिकाणी दहा विहिरी व िवधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. पुढील महिन्यात टंचाई अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. टँकरची संख्या हजाराचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्यास प्रयत्न केले जात असले, तरी कूपनलिका घेण्यासाठी असलेली अट आणि खालावलेली भूजलपातळी अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध होणे अशक्य आहे.