जिल्हास्तरावर खरिपापूर्वी निवेदनांची संख्या वाढली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : करोनाकाळातील अडचणीत ग्रामीण जनतेला खत भाववाढीमुळे अधिक संकटात लोटल्यासारखे होईल, असे म्हणत खत किमती पूर्ववत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खत आणि रसायनमंत्री सदानंद गौड यांच्याकडे केली आहे. राज्यभरातून मंगळवारी विविध पक्षांनी खतांच्या वाढत्या किमतीवरून केंद्र सरकारला निवेदने पाठविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनही या अनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला असून केंद्राशी चर्चा करून आवश्यकता भासली तर राज्य सरकारकडूनही सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांना खताच्या किमती वाढल्याबाबतचे पत्र लिहिले होते. यामध्ये १०-२६-२६ या खताची पन्नास किलोची गोणी १ हजार १७५ रुपयांहून १ हजार ७७५ रुपयांपर्यंत नेण्यात आली. तर डीएपी खताचा दर १ हजार १८५ रुपयांवरून १ हजार ९०० रुपयांना विक्री होणार आहे.

खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतकरी आता खते आणि बियाणे खरेदीसाठी बियाणांच्या दुकानाकडे येत आहे. करोना संसर्ग त्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध यामुळे शेतकरी नव्या अडचणीत सापडला आहे. नव्याने डिझेलचे दरही वाढत असल्याने अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे टॅक्टर, रोटावेटर या यंत्रांसह मशागत करणे अधिक महाग झालेले आहे.

अशा स्थितीमध्ये वाढलेले खतांचे दर शेतकऱ्यांची समस्या वाढविणारे असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले होते. त्या आधारे शरद पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. खत किमतीवरून आता राज्यातील विविध नेते निवेदने देत असून खरिपापूर्वी वाढत्या खत किमती कमी करणाऱ्या निवदेनांचा पाऊस पडू लागला आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही या अनुषंगाने निवेदन दिले असून लातूर येथून मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनीही मागणी केली आहे.

जालन्यात पक्ष-संघटना आक्रमक

रासायनिक खतांची भाववाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी जालन्यातील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना, युवासेना, किसान सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, बाजारात नवीन व जुने खत उपलब्ध आहे. जुने खत नवीन दरात विक्री होत असल्यास शेतक ऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar demand center rising prices fertilizers akp
First published on: 19-05-2021 at 00:29 IST