scorecardresearch

बंडाळीनंतर सत्तारांच्या मतदारसंघात शिवसेनेची दमछाक

बंडाळीनंतर प्रत्येक मतदारसंघात मेळावे घेतले जात असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात निषेध नोंदिवण्यासाठी आणि निदर्शने करण्यासाठी लागणारे कार्यकर्ते जमवताना शिवसेनेची अक्षरश: दमछाक होत आहे.

Bench restrains Minister of State Abdul Sattar sand contract extension
राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : बंडाळीनंतर प्रत्येक मतदारसंघात मेळावे घेतले जात असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात निषेध नोंदिवण्यासाठी आणि निदर्शने करण्यासाठी लागणारे कार्यकर्ते जमवताना शिवसेनेची अक्षरश: दमछाक होत आहे. भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असणारे अब्दुल सत्तार २०१८ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत पोचले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक पदे आपल्याच समर्थकांना मिळवून दिली. सत्तार यांच्या बंडानंतर शिवसेना संघटनही कोलमडले. सिल्लोडमध्ये ‘सत्तारसेने’कडून त्यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आता शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतानाही चाचपडत आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार माध्यमांमध्ये कोणाची टोपी उडवतील याची खात्रीच देता नाही. त्यांच्या उपस्थितीमध्ये जेवढा मोठा कार्यक्रम तेवढी आयोजकाला भीती. स्वपक्षीय नेत्यांवरही ते कधी घसरतील हे सांगता येत नसल्याने ते माध्यमांमध्ये चर्चेत असतात. काँग्रेसमध्ये असताना ते अशोकराव चव्हाण यांच्या अगदी जवळचे मानले जात. पण काँग्रेस सोडताना त्यांनी चव्हाण यांच्यावरही टीका केली. विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी केलेली टीका चर्चेत होती. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस भवनमध्ये दिलेल्या प्लास्टिकच्या खुच्र्याही त्यांनी नंतर उचलून नेल्या. युतीमध्ये भाजपकडे मुख्यमंत्री पद असताना त्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी कमालीचे प्रयत्न केले. अगदी विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या यात्रेच्या गाडीतही ते शिरले. पण जागावाटपात सिल्लोड मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेच्या वाटय़ाला गेला आणि सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. पण असे करताना तालुका प्रमुखपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावली. तालुकाप्रमुख म्हणून नेमण्यात आलेले देविदास लोखंडे हे बंडानंतर सत्तार यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शनात उतरले. सर्व पदाधिकारी सत्तार यांच्या बाजूला गेले. त्यामुळे पूर्वीपासून शिवसेनेत काम करणारे सुदर्शन अग्रवाल यांना बंडखोरांविरुद्धाचा सूर उंचावता यावा म्हणून प्रयत्न करावा लागत आहे. ग्रामीण भाागातून शिवसेनेचा मतदार पुन्हा जोडता येतो का, याची चाचपणी केली जात आहे.

सत्तार ज्या पक्षात जातात त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची कमालीची स्तुती करतात. शिवसेनेतील नेत्यांपेक्षाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयीची स्तुतिसुमने वाहणाऱ्या सत्तार यांनी अलीकडेच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्ते उभे करून त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षांव केला होता. पण बंडामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. सत्तार यांची ही राजकीय वर्तणूक त्यांच्या मतदारसंघातील बांधणीमध्ये असल्याचे सांगण्यात येते. १५ वर्षांपासून आमदार म्हणून काम करताना नगरपालिकेसह सर्व संस्थांवर त्यांचा ताबा आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो, निवडून येण्याची क्षमता असल्याने आमदार सत्तार जाईल त्या पक्षात स्वमर्जीने वागतात.

अन्य पक्षातील आमदारांना पक्ष संघटनेतील पदे दिल्यामुळे आता शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. त्यांना मेळावा घेण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. या अनुषंगाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अन्य बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ठेवण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. सिल्लोडमध्येही अशी निदर्शने व मेळावे घेण्याचे नियोजन केले जात आहे.’

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena ruling constituency prohibition register demonstrations activists ysh

ताज्या बातम्या