मागेल त्याला शेततळे, शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग यासह कृषी मूल्य आयोगाची मागणी पूर्ण करण्यासह विविध योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्या असल्याचे सांगितले जात असले तरी सौर कृषी पंप देण्यात येणार होते त्याचे काय, या प्रश्नावर रविवारी आयोजित पत्रकार बैठकीत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह एकाही नेत्याने उत्तर न देता बगल दिली. दरम्यान पाच एकरपेक्षा काही अधिक जमीन असणाऱ्यांबाबतही कर्जमाफीचा विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भाजप किसान मोर्चाला दिल्याचे प्रदेशाध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
रेल्वेस्थानक मार्गावरील भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे ५ एकपर्यंतच्या २७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत व राज्य सरकारने मागील अडीच वर्षांत शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी मोर्चाच्या वतीने काढलेले ‘शेतकऱ्यांचे तारणहार मोदी-फडणवीस सरकार’ या पत्रकावरील माहिती दिली. शीतगृह, गोदाम आदी बांधण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करून भाई मुंडे यांनी किसान मोर्चाच्या वतीने ५ एकरपेक्षा काही आर, गुंठे जमीन असेल त्यांच्याबाबतही धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार अगदीच बारकावे पाहणार नाही. ५ एकर १० गुंठ्ठे जमीन असणाऱ्यांबाबतही कर्जमाफीचा विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भाई मुंडे यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीला उपस्थित असलेले भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य सरकारने राबविल्याचे सांगितले. मात्र मागेल त्याला शेततळी मिळण्यास अडचणी येत असून सौर कृषी पंपाचे काय, असे विचारले असता त्यांनी शेततळी मिळत असल्याचा दावा केला. मात्र सौर कृषी पंपाबाबत बोलणे टाळले. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिल्यानंतर त्यांनी याबाबत स्थानिक परिस्थितीची माहिती नसल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याकडे बोट केले. उपस्थित नेत्यांपैकी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे, मकरंद बोर्डे, दिलीप बनकर, कैलास पवार, सुहास सिरसाट यांच्यापैकी कोणीही सौर कृषी पंप देण्याच्या विषयावर पुढे येऊन भाष्य केले नाही.
योजनांबाबत अधिकारी शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडतात, त्यावर आपल्याच सरकारमधील मंत्री, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही संताप व्यक्त करीत आहेत. अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कोंडीमुळेच शेतकऱ्यांमधील उद्रेक संपाच्या रुपातून बाहेर पडत नाही का, या प्रश्नावर संपातील नासधूस आदींमध्ये विरोधी पक्ष पुढे असून शेतकरी नाही, असे उपाध्ये म्हणाले. प्रशासकीय स्तरावर होणारी ससेहोलपट व शेतकरी संपातील उद्रेक, याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करताना उपाध्ये यांनी सरकारची बाजू झाकण्याचा प्रयत्न केला.