छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण असा काही निर्णय करावयाचा झाला तरी त्याबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलीनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपच्या नेत्यांना द्यावी लागेल. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांचा आमच्या बरोबरचा व्यवहार पूर्वीच्या आघाडीपेक्षा सौहार्दपूर्ण असल्याचेही तटकरे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी सुनील तटकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. १९९९ च्या विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर आम्ही अगदी थेट लढलो होतो. भाजपचे नेतृत्व जेव्हा वाजपेयी यांच्या हाती होते, तेव्हाही राष्ट्रवादीला भाजपबरोबर जाता आले असते. पण तसे केले नाही. आता मात्र अधिवेशनात ठराव घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही तटकरे म्हणाले. या पत्रकार बैठकीस जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, महिला आयोगाचा अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर, आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती.

शरद पवार यांची विचारसणी तरीही..

जर राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार शरद पवार यांच्या विचारसरणीवर अवलंबून असतील तर त्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध असल्याचे म्हटले आहे आणि सत्तेतील पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनसुरक्षा कायद्याच्या बाजूने आहे, या विरोधाभासाविषयी तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, सत्तेतील पक्ष आहे. आणि विधिमंडळात या कायद्याचे पूर्ण वाचन झालेले आहे. त्यामुळे या कायद्याला पाठिंबा आहे. शरद पवार यांच्या विचारांना नाकारणे असा याचा अर्थ काढता येणार नाही, असेही तटकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटन बांधणीसाठी प्रयत्न

उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीमध्ये ५९ जागा लढवून ४१ जागांवर यश मिळाले. विधानसभा निवडणुकीमधील तीच जिद्द कायम ठेवून महापालिका निवडणुका लढविल्या जातील. काही ठिकाणी महायुतीशिवाय निवडणूक लढवायची का, याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेऊन घेतला जाईल, असेही तटकरे म्हणाले.