छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील प्रमुख शाखांमधील पदव्युत्तर वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आलेख यंदाही घसरणीलाच लागला असून, ऑगस्टच्या मध्यापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी घटले आहेत. विद्यापीठातील ५७ विभागांच्या अभ्यासक्रमांशी संबंधित ही विद्यार्थी संख्या आहे. व्यावसायिकसह ३० अभ्यासक्रमांच्या प्रवेश संख्येची पाटी कोरीच असून, त्यात बिझनेस व्यवस्थापन, औषधनिर्माणशी संबंधित महत्त्वाचे विषयही आहेत. शिवाय ३१ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची संख्या एक संख्येत असल्याची माहिती समोर आली आहे.
गतवर्षी (२०२४-२५) ३ हजार ४८० पदव्युत्तरचे विद्यार्थी होते, तर यावर्षी २ हजार ८६२ च्या आसपास आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरून प्रवेशाची मुदत वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या विधी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असून, तब्बल ६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी पदविका, उर्दू, अर्थशास्त्र आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४० ते ५० च्या मध्ये आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेशी संबंधित अभ्यासक्रमांना एकूण ४५०, मानव्य शास्त्र आणि तंत्रज्ञान शाखेशी संबंधित ८७२ तर वाणिज्य आणि व्यवस्थापनशी संबंधित १०९, असे एक हजार ४३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती आहे. विद्यापीठाने हौसेने सुरू केलेल्या विषयांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षासाठी ‘ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी), बीएस्सी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी. एस्सी डाटा सायन्स, बीसीए व बीए मानसशास्त्र असे चार ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
यावर्षी विद्यार्थी प्रवेशाची संख्या चांगली आहे. शून्य संख्या असलेली १० ते १२ अभ्यासक्रम आहेत. काही विषय हे दुर्मीळ आहेत. लिबरल आर्ट आदींसारखे. अशा काही विषयांना प्रत्येक वर्षीच फारसा प्रतिसाद मिळत नाही. – डाॅ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरू.