छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा ६३ लाख रुपये किमतीचा साठा  वाहतूक करणारा ट्रक, असा सुमारे ८३ लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला. गस्तीवरील गुन्हेशाखा पोलिसांनी ही कारवाई सोमवारी मध्यरात्री धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील करोडी पथकर नाक्याजवळ केल्याची माहिती शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.

बनेसिंग बाबूलाल कटारिया (37 वर्ष, रा. बडागाव, नलखेडा, जि.अगर मालवा, शाजापूर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास करोडी टोलनाक्याजवळ गस्तीवर असतांना ट्रक क्रमांक (डी.डी.०१-जी-९०९२) हा संशयास्पदरित्या जातांना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालक बनेसिंग कटारिया याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता, अमरावती येथून मुंबई येथे गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा घेवून जात असल्याचे ट्रक चालकाने सांगितले. पोलिसांनी ट्रकमधून ५६ लाख २५ हजार रुपये किंमतीचा बाजीराव गुटखा, 6 लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मस्तानी जर्दा असा एकूण ६३ लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा, आणि वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ८३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी ट्रकचालक बनेसिंग कटारिया याच्याविरुध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, पोलिस अंमलदार सतीश हंबर्डे, संतोष भानुसे, शैलेश आस्कर, यशवंत गोबाडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने केली.