नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बामणी फाट्याजवळ खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री उशिरा नांदेडहून येणारी टाटा इंडिका आणि नांदेडच्या दिशेने जाणारी क्रुझर यांची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक नवनाथ नारायण घुगे (४४) रा. राशनवाडी ता. चाकूर जि. लातूर जागीच ठार झाला. तर इंडिका कारमधील सुरेंद्र शिवाजीराव जवळकर (५५) रा. पावडेवाडी नांदेड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नांदेडमधील पावडेवाडी येथील रहिवाशी नांदेड येथून ऊमरखेडकडे एम एच २६ एएफ ०७७० क्रमांकाच्या इंडीका कारमधून जात होते. तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या राशनवाडी येथील काही प्रवाशी वर्धा येथील धनगर समाजाचा मेळावा आटोपून ऊमरखेड-नांदेड मार्गे लातूरच्या दिशेने जात होते. हदगांवपासून १६ किमी अंतरावर असलेल्या बामणी फाट्याजवळ टाटा इंडीका आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक जागीच ठार झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र जवळकर यांना गावकऱ्यांनी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक काशीनाथ बालाजी शिरगिरे (वय ३७) रा गोंडेवाडी ता. लोहा व क्रुझर जिप मधील राजू कुंडलीक वागलवाडे ( वय ६०) रा. राशनवाडी गंभीर जखमी असून प्रथोमचारानंतर त्यांना उपचारांसाठी नांदेडमध्ये हलवण्यात आले. अपघाताची नोंद मंठा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.