छत्रपती संभाजीनगर : मोसंबीने भरलेल्या भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत कारमधील पाचपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, झाला उर्वरीत तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास फुलंब्री-राजूर मार्गावरील पिंपळगाव-गांगदेव शिवारात घडली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला.आदित्य राजू कोलते (वय २५) व सतीश केशव कोलते (२४, दोघेही रा. टाकळी कोलते ता.फुलंब्री) असे मृत झालेल्या तरुणांची नावे आहे.

अन्य दोन जण जखमी झाले आहेत. हे चौघे जण कारने फुलंब्रीकडून कार (क्रमांक एम.एच.२०, ई वाय ४४५१) टाकळी कोलतेकडे जात होते. यावेळी समोरून फुलंब्रीकडे येणाऱ्या आयशर टेम्पोची (एम.एच.२१, बी.एच.१६९७) या कारला जोराची धडक बसली. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी कारमधील जखमींना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी आदित्य कोलते व सतीश कोलते या दोघांना तपासून मृत घोषित केले. तर अक्षय भगवान कोलते, अजय बबन सोळुंके या दोन जणांची मात्र गंभीर प्रकृतीमुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी ट्रक व कार काही वेळ रस्त्यावर अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, या अपघाताची नोंद फुलंब्री पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.