औरंगाबाद : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसमध्ये एलएनजी (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसविली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या टप्प्यात ५०० बसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात असल्याची माहिती रा.प. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. केवळ एलएनजी नव्हे, तर सीएनजी इंधन म्हणून वापरण्यावरही भर असून केंद्र सरकारकडून राज्यासाठी १५० इलेक्ट्रिकल बसही उपलब्ध होणार आहेत.

सध्या महामंडळाला खासगी आरामदायी बसची आवश्यकता आहे. शिवशाहीच्या कंत्राटदाराने पूर्वी राज्यात ५५० बस चालविल्या. कोणत्याही भांडवली गुंतवणुकीशिवाय व चालकाच्या खर्चाविना सुरू असणाऱ्या या बसच्या व्यवहारातून कंत्राटदाराने काही बस काढून घेतल्या आहेत. त्यामुळे नव्या खासगी बसची राज्य परिवहन मंडळाला गरज आहे. येत्या काळात मालवाहतुकीमध्येही महामंडळ उतरणार असून जुन्या बस याकामी वापरण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील ५०० हून अधिक बस पहिल्या टप्प्यात चालू झाल्यानंतर ती इंधन व्यवस्था उभी करण्याकडे भर असेल, तसेच सीएनजी इंधनाकडेही वळण्याचा विचार असून प्रदूषण कमी करणारी बस वाहतूक व्हावी असा राज्य परिवहन मंडळाचा प्रयत्न असणार आहे.

बस कोणाच्या मालकीची यावर प्रवासी प्रवास करत नाहीत. त्यामुळे शिवशाहीचा प्रयोग यशस्वीच होता. सुरुवातीच्या काळात नफ्याच्या मार्गावर त्या चालविण्यासाठी तसे मार्ग शोधण्याची गरज होती. तसेच पहिल्या टप्प्यात अपघाताचे प्रमाणही होते. पण त्यावर आता मात करण्यात आली आहे. साधी बस आणि शिवशाही यांची प्रति किलोमीटर मिळणारी रक्कम लक्षात घेता शिवशाहीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही घडी नीट बसत असतानाच करोना आला. त्यामुळे अडचणी आल्या. पूर्वी ५५० बस चालविल्या जात. आता ही संख्या २०० ते २२५ च्या घरात आली आहे. कंत्राटदाराने ही संख्या कमी केली आहे. त्यामुळे खासगी बसची आजही महामंडळाला गरज असल्याचे चन्ने म्हणाले.

बस स्थानकांच्या विकासासाठी..

’ राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या जागांवर विविध प्रकल्पांसाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा अशा योजना आखल्या, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बाजारपेठेत तेजी आल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळू शकतो, असे चन्ने यांनी सांगितले.

’ बस स्थानकांचे बांधकाम करताना दीड चटई निर्देशांक मिळत आहे. त्यातील अर्धा चटई निर्देशांक महामंडळाकडे तर अन्य भाग एजन्सीला वापरून बस स्थानके विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद शहरातील सिडको बस स्थानक त्याच पद्धतीने उभे करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of natural fuel in older st buses for pollution control zws
First published on: 21-12-2020 at 00:19 IST