छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उचलून गोदावरी पात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. येत्या काळात समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी विखे पाटील यांनी दिले.

गोदावरी खोऱ्यात ६५ अब्ज घनफूट पाणी वळवून आणण्यासाठी प्रयत्न करू. महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे विखे म्हणाले. या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे, विलास भुमरे, हिकमत उडान, विठ्ठलराव लंघे, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांची उपस्थिती होती.

गोदावरीतील पाण्याची तूट भरून काढतानाच १२ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प, तरंगत्या सौर पटलाच्या आधारे ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प व्हावेत यासाठी चालना देत असल्याचेही विखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी १५० कोटी रुपये दिले असून, एक वर्षात ही योजना पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. जायकवाडी जलाशयातील गाळ काढून क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. जल प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पद्धतीने मिळावे, अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी केली.
जलसाठा आणि विसर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणामध्ये ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी १ हजार ५२०.१८ फूट एवढी असून, त्यात ९५ .१५ अब्ज घनफूट (टीएमसी) जलसाठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या १८ दरवाजे अर्धा फूट उघडून ९४३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सद्यस्थितीत धरणात १६ हजार २३० प्रति संकेद लिटर एवढी पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.