छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सकाळी ‘एमजीएम’मधील रुक्मिणी सभागृहात करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवतींना या पुरस्कारांतर्गत सन्मानित करण्यात येते.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, समर्पित भावनेने, जिद्द, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे भविष्य असणाऱ्या तरुणाईस युवा पुरस्कार देत असताना अभिमान वाटतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंटरचे जिल्हा अध्यक्ष अंकुशराव कदम, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. अपर्णा कक्कड, कवी दासू वैद्य, संयोजक नीलेश राऊत, केतकी नेवपूरकर, गौरव सोमवंशी, संतोष मेकाळे आदींची उपस्थिती होती. या सोहळ्यात सात विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले.
साहित्य – विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा), इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी), क्रीडा – ओजस देवतळे (नागपूर), हृतिका श्रीराम (सोलापूर), पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे), ज्योती वाय. एल. (मुंबई), उद्योजक – जयेश टोपे (नाशिक), शिवानी सोनवणे (पुणे), रंगमंचीय कलाविष्कार – कृष्णाई उळेकर (धाराशिव), तन्वी पालव (सिंधुदुर्ग), ऋतुजा सोनवणे (जळगाव), कल्पेश समेळ (रायगड).


