यंदा ऑगस्टमध्ये किरकोळ वाहन विक्रीत ८.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (FADA) ने गुरुवारी दिली.
एफएडीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीची एकूण संख्या १५ लाख २१ हजार ४९० युनिट होती, तर ऑगस्ट २०२१ मध्ये १४ लाख ०४ हजार ७०४ युनिट्सवर होती. याशिवाय, प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीची संख्या २ लाख ७४ हजार ४४८ होती. जी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ लाख ५७ हजार ६७२ होती. म्हणजेच, प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत ६.५१ टक्के वाढ झाली आहे.
तीन चाकी वाहन विक्रीत ८३.१४ टक्क्यांची वाढ
यंदा ऑगस्टमध्ये दुचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर ८.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुचाकी विभागातील किरकोळ विक्री १० लाख ७४ हजार २६६ युनिट्स एवढी होती. जी मागील वर्षी याच महिन्यात ९ लाख ८९ हजार ९६९ होती. थ्री व्हीलर सेगमेंटबद्दल बोलायचे झाले, तर ऑगस्ट महिन्यात ८३.१४ टक्के वाढ झाली. तीनचाकी विभागात ५६ हजार, ३१३ युनिट्सची विक्री झाली. जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३० हजार ७४८ युनिट्स होती.
(हे ही वाचा : Mahindra XUV 400 Launch : अशी दिसते महिंद्रा एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक, पाहा टिझर व्हिडिओ)
व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत २४.१२ टक्के वाढ
ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक वाहन विभागामध्ये २४.१२ टक्के वाढ झाली. या महिन्यात ६७ हजार १५८ युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी याच महिन्यात ५४ हजार १०७ मोटारींची विक्री झाली होती.
अपेक्षेपेक्षा वाहनांची कमी विक्री संख्या
एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, यंदाची ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीची २०१९ च्या ऑगस्ट महिन्याशी तुलना केली तर एकूण किरकोळ विक्रीत सात टक्क्यांची घट झाली आहे. तर प्रवाशी वाहनांमध्ये ४१ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, व्यावसायिक वाहनांमध्ये सहा टक्के वाढ दिसून आली. दुसरीकडे, दुचाकी, तीन चाकी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत अनुक्रमे १६ टक्के, १ टक्के आणि सात टक्क्यांची घट आहे.दिसून आली आहे.