काश्मीर प्रकरणी ह्युंदई, किया या कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. यामुळे नाराज भारतीय युजर्स सोशल मीडियावरुन या कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. या प्रकरणी कंपन्यांनी माफी मागावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र कंपनीने अद्याप कोणताही माफीनामा दिलेला नाही. या प्रकरणाची फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) दखल घेतली आहे. ह्युंदई पाकिस्तान आणि किया पाकिस्तान यांनी सोशल मीडियावर काश्मीर मुद्द्यावर केलेल्या पोस्टप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी Fada ने केली आहे.
FADA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही ह्युंदई पाकिस्तान आणि किया पाकिस्तान यांनी काश्मीरवर केलेल्या ट्विटचा तीव्र निषेध करतो. आम्ही आमच्या मातृभूमीसाठी वचनबद्ध आहोत आणि याबाबत आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही भारतातील दोन्ही कंपन्यांना पत्र लिहिले आहे. आम्ही अवजड उद्योग मंत्रालय आणि सियाम इंडियाकडे मागणी केली आहे आणि ह्युंदईकडून स्पष्टीकरण घेण्यास सांगितलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अनंतकाळ राहील, जय हिंद.”
दुसरीकडे, केएफसी पाकिस्तानच्या अधिकृत खात्यावरून काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या समर्थन करण्यात आलं होतं. ही पोस्ट अंगलट आल्यानंतर केएफसी इंडियाने सारवासारव केली आहे. केएफसी इंडियाने एक ट्वीट करत माफी मागितली आहे. केएफसीने लिहिलं आहे की,”देशाबाबहेर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टप्रकरणी आम्ही माफी मागत आहोत. आम्ही भारताचा सन्मान करतो आणि भारतीयांची सेवा करण्यास आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत.”