वेळोवेळी गाडीला सर्व्हिंग न करणे, धूळ स्वच्छ न करणे अशा अतिशय लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने, अनेकदा आपली गाडी खराब होऊ शकते. यासह गाडीला गंज लागणे हेदेखील एक महत्वाचे कारण आहे. आपले वाहन हे लोखंडी वस्तू वापरून बनवलेले असते; आणि आपल्या येथील हवामानामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे गाडीला गंज लागण्याची शक्यता अधिक असते.
जेव्हा लोखंड ऑक्सिजन किंवा पाणी यांच्या संपर्कात येते तेव्हा त्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडून, लोखंड खराब होते. खराब लोखंड तांबूस रंगाचे दिसू लागते. अशा खराब झालेल्या लोखंडाचा गाडीवर वाईट परिणाम होऊ शकतो. अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते. मात्र असे होऊ नये, त्यासाठी काही सोप्या टिप्स पाहा.
हेही वाचा : भन्नाट शोध! एका चार्जिंगमध्ये ५० वर्ष चालणारी बॅटरी; कुठे तयार होत आहे जाणून घ्या…
गाडीला गंज लागू नये यासाठी ४ टिप्स पाहा
१. गाडी स्वच्छ आणि कोरडी ठेवणे
गाडीची साफसफाई करताना, गाडी पाण्याने धुतल्यानंतर तिला व्यवस्थित कोरडे करणे खूप गरजेचे असते. कारण गाडी धुताना पाणी लहान लहान जागांमध्ये जाते आणि ते तसेच राहिल्यास त्याठिकाणी गंज लागू शकतो. त्यामुळे एखाद्या मऊ कापडाने गाडीचे सर्व कोपरे नीट पुसून त्यांना कोरडे करून घ्या.
२. गाडीवरील चरे आणि डेन्ट लगेच काढू घ्या.
गाडीला धक्का लागून, दुसरी गाडी आपटून त्यावर चरे म्हणजे स्क्रॅचेस पडतात; तर कधी वाहनांवर डेन्ट पडतो. अशा गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गाडीवर स्क्रॅच आल्याने तेथील रंग जाऊन, लोखंड थेट हवेच्या संपर्कात येऊन तो भाग खराब होऊ शकतो, गंजू शकतो. त्यामुळे अशा भागांवर शक्य तितक्य लवकर पुन्हा रंग लावावा. गाडीवरील डेन्ट मोठा असल्यास मेकॅनिककडे जावे.
३. रबर मॅट्स
आपण घातलेल्या चपलांवर प्रचंड प्रमाणात घाण, माती असते. अशा चपला घालून जर तुम्ही बिना मॅटच्या गाडीत बसलात तर त्याने वाहन खराब होऊ शकते. त्यामुळे गाडीमध्ये कायम एखादे चांगले रबर मॅट घालून ठेवावे.
हेही वाचा : पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक तर होत नाही ना? वाहनात पेट्रोल भरताना ‘या’ पाच टिप्स लक्षात ठेवा
४. गाडीला कव्हर घालणे
जर तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जाणार असाल आणि गाडी पार्किंगमध्ये लावून ठेवणार असल्यास तिला कायम झाकून ठेवा. कारण- वातावरणातील धूळ-मातीचा थर अगदी काही दिवसांमध्ये वाहनावर जमा होते. परिणामी गाडीला गंज लागू शकतो, गाडी खराब होऊ शकते. त्यामुळे वाहनासोबत आलेले कव्हर घालून गाडी झाकून ठेवणल्याने असे होण्यापासून टाळता येऊ शकते.