सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची जास्त मागणी आहे. त्यामुळे विविध कंपन्या ग्राहकांसाठी दमदार इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देत आहेत. तुम्हीदेखील ई-स्कूटर खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी ‘सिंपल एनर्जी’नेही ई-स्कूटर लाँच केली आहे. या ई-स्कूटरचे नाव ‘डॉट वन’, असे आहे. तसेच ई-स्कूटर एका चार्जवर १५१ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते आणि ही सगळ्यात जास्त रेंज असलेली स्कूटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच काही ग्राहकांनी याआधी ‘सिंपल वन’ स्कूटरची प्री-बुकिंग केली होती त्यांच्यासाठी ‘डॉट वन’ ही नवीन ई-स्कूटर ९९,९९९ रुपयांना वास्तविक किमतीत लाँच करण्यात आली आहे. तसेच ही एक खास ऑफर आहे; जी स्टॉक संपेपर्यंत राहू शकते. तसेच नवीन ग्राहकांसाठी जानेवारी २०२४ मध्ये किंमत जाहीर केली जाईल; जी सध्याच्या किमतीपेक्षा थोडी जास्त असेल.
‘सिंपल एनर्जी’ कंपनीने सांगितले आहे. डॉट वन ई-स्कूटर पूर्णपणे भारतातच बनवली गेली आहे. प्रथमच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची योजना आहे. स्कूटर एका फिक्स बॅटरीसह एकाच व्हेरिएंटमध्ये नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट व अझर ब्लू अशा चार रंगांसह उपलब्ध आहे. तसेच अधिक रंग पर्याय हवे असणाऱ्यांसाठी LightX व BrazenX या रंगांमध्येही ई-स्कूटर उपलब्ध आहे. स्कूटर 750W चार्जरसह येते. तसेच या ई-स्कूटरची सगळ्यात आधी बंगळुरू आणि इतर शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू होईल.
डॉट वन ई-स्कूटरचे खास फीचर :
कंपनीचा दावा आहे की, ही ई-स्कूटर सर्वांत वेगवान स्कूटर आहे; जी केवळ २.७७ सेकंदांत ० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने जाते. त्यात ३.७ kWh बॅटरी आणि ८.५ kW इलेक्ट्रिक मोटर आहे; ज्यामुळे ते ७२ Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. त्यात सीबीएस सुरक्षा फीचर आणि डिस्क ब्रेक आहेत. स्कूटरमध्ये सीटखाली ३५ लिटर स्टोरेज स्पेस आहे. त्यात टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील आहे; जी तुमच्या फोनमधील ॲपशी कनेक्ट होते.
सिंपल एनर्जी या कंपनीचे संस्थापक व सीईओ सुहास राजकुमार म्हणाले, “आज ‘सिंपल एनर्जी’च्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. कारण- आम्ही सिंपल डॉट वन लाँच करीत आहोत; जो आमच्या विस्तारित पोर्टफोलिओचा सगळ्यात नवीन सदस्य आहे. डॉट वन आमच्या आदरणीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक फीचर, डिझाइनसह स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तसेच आम्हाला खात्री आहे की, ‘सिंपल एनर्जी’ची डॉट वन केवळ बाजारपेठेतच ठसा उमटवणार नाही, तर ती विवेकी ग्राहकांचीही मने जिंकेल.”