अमेरिकेची वाहन निर्मिती करणआर प्रमुख कंपनी फोर्ड मोटर्सने भारतातून आपला गाशा गुंडाळणार असल्याचं सप्टेंबरमध्ये सांगितलं होतं. देशात सुरु असलेले कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. मात्र आता केंद्राच्या पीएलआय योजनेत फोर्ड मोटर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फोर्ड पुन्हा भारतात येईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. भारताबाहेर पडण्याची घोषणा करणाऱ्या फोर्ड इंडियाची ‘चॅम्पियन ओईएम इन्सेंटिव्ह स्कीम’ अंतर्गत २० कार निर्मात्यांमध्ये निवड करण्यात आली आहे – पीएलआय योजनेचा एक भाग म्हणून २५,९३८ कोटी रुपये अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूरी देण्यात आली आहे. भारतातील कारचे उत्पादन थांबवूनही फोर्ड मोटरचा केंद्राच्या पीएलआय योजनेत समावेश केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या १० वर्षात फोर्ड कंपनीला २ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. तर २०१९ मध्ये नॉन आपरेटिंगमुळे ०.८ अब्ज डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे ९ सप्टेंबर २०२१ रोजी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकनं कार निर्मात्या कंपनीच्या निवडीचा अर्थ असा नाही की, ते भारतात कारचे उत्पादन आणि विक्री सुरू करतील. खरं तर, कार निर्मात्या कंपनीने येत्या काही दिवसांत आपल्या जागतिक इव्ही योजनांचा विस्तार करण्यासाठी भारतात आपल्या सुविधांचा वापर करण्याची योजना आखली आहे. फोर्डने सांगितले की निर्यातीसाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याची योजना आहे. कार निर्मात्याने या दशकात इव्ही आणि बॅटरीमध्ये ३० अब्ज अमेरिक डॉलर गुंतवण्याची आपली योजना आखली होती. जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित असताना, फोर्ड मोटर भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री करण्याची शक्यता नाकारली नाही. फोर्ड इंडियाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, “यावर सध्या कोणतीही विशिष्ट चर्चा झालेली नाही, परंतु भविष्यातील यावर चर्चा होऊ शकते”. भारतात कारचे उत्पादन बंद करण्यापूर्वी, फोर्डने सानंद आणि मराईमलाई येथील दोन प्रकल्पामधून काम केले आहे. फोर्ड कंपनीने म्हटले आहे की, ते इव्ही उत्पादनासाठी निर्यात आधार म्हणून भारतातील एक प्लांट वापरण्याची शक्यता शोधत आहे, शक्यता गुजरातमधील साणंद येथे आहे.”
फोर्ड मोटरला दिलेल्या प्रोत्साहनासह भारतात इव्ही तयार करण्यासाठी केंद्राने दिलेली मान्यता देखील टेस्लासाठी धक्का आहे. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतात प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे. केंद्राने इव्हीवर लावलेलं उच्च आयात शुल्क हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टेस्लाने देखील भारतात अद्याप उत्पादन योजना जाहीर केलेली नाही.