स्कूटर्स आणि बाइक्सच्या क्षेत्रातील विख्यात कंपनी यामाहा सध्या R15, MT-15 आणि FZ रेंजच्या मोटरसायकल्सची विक्री भारतात करत आहे. सध्या भारत सरकार आणि ग्राहक दोघांचाही ओढा इलेक्ट्रिक वाहनांकडे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना आता भारतीयांसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.
आणखी वाचा : ‘Honda’ची नवीन स्वस्त बाईक लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लाँच; कमी किमतीत मिळणार जबरदस्त मायलेज
कंपनीतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या सुरुवातीस युरोपात यामाहातर्फे नीओ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली. त्यासाठी वापरलेली यंत्रणाच प्रामुख्याने या स्कूटरसाठी वापरण्यात येणार आहे. यामाहा मोटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंदर सिंग यांनी या संदर्भात ‘इंडिया टुडे’ला एक मुलाखत दिली असून त्यात ते म्हणतात, सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने सर्वांचा ओढा वाढतो आहे. यापूर्वीच युरोपात यामाहाने नीओ लाँच केली, आता भारतीय बाजारपेठेच्या गरजेनेनुसार त्याच यंत्रणेचा वापर करत स्कूटर कशी विकसित करता येईल यावर भारतातील आणि कंपनीच्या मुख्यालयातील इंजिनीअर्स काम करत आहेत. भारतामध्ये तापमान हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे इथल्या वातावरणासाठी मॉडेल्स विकसित करताना याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. शिवाय सुरक्षा हाही महत्त्वाचाच मुद्दा आहे. सध्या त्याचा अभ्यास काही चाचण्याही सुरू आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना रविंदर सिंग पुढे म्हणाले, इतरत्र चाचण्या सुरू असतानाही भविष्यात ज्या बाजारपेठेत वाहन लाँच करायचे आहे, त्या संदर्भातील सर्व गोष्टी ध्यानात असतात आणि कंपनी त्यावर एकाच वेळेस काम करत असते. ज्या बाजारपेठेत ते लाँच करायचे त्या ठिकाणचे वातावरण महत्त्वाचे असते. कंपनीला काही उत्पादनांची विक्री करण्याबरोबरच ग्राहकवर्ग टिकवणे आणि ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. भारताच्या बाबतीत या सर्व बाबींवर काम सुरू असून योग्य वेळ येताच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल.
आणखी वाचा : वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी: Toyota Innova Hycross दमदार फीचर्ससह पुढील महिन्यात लाँच होणार
ही स्कूटर भारतात लाँच करताना तिच्या मोटर, बॅटरी आणि स्पेसिफिकेशन्समध्ये काही बदल निश्चितच करावे लागणार आहेत. त्यामुळे युरोपातील नीओपेक्षा ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगळी असेल, असेही सिंग म्हणाले.
यामाहाचे प्रतिस्पर्धी असलेल्या हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर कंपनी यांनी यापूर्वीच इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणल्या आहेत. आता यामाहानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.