ग्रीष्म ऋतू आला. झाडावरची पिकली पानं गळू लागली. हिरव्या पानांनी हळहळ व्यक्त करून त्यांना जड अंत:करणाने निरोप दिला. एक दिवस आपल्यावर देखील गळून जाण्याची पाळी येणार याची त्यांना जाणीव होती. म्हणून कुणी उतलं नाही, मातलं नाही.

गळलेलं एक मोठं पिवळं पान जमिनीवर असलेल्या ढेकळाच्या जवळ पडलं. ढेकूळ फार भुसभुशीत नव्हतं. अंगानं गलेगठ्ठ आणि वजनानं थोडं भारी होतं. दगडासारखं टणक नसलं, तरी पाण्यानं सहज विरघळणारं नव्हतं.

पिकलेलं पान आपल्याजवळ पडल्याचं पाहून ढेकूळ आनंदानं म्हणालं, ‘बरं झालं, तू माझ्या नजीक पडलास ते! इतके दिवस कुणाचीही सोबत नसल्यामुळे मला कसं चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. तू आल्यामुळे आपल्याला छान गप्पा मारता येतील. सुख-दु:खाची देवाण घेवाण करता येईल.’

पिकल्या पानालादेखील ढेकळाचे आपुलकीचे उद्गार ऐकून आनंद झाला. पण पानाला भविष्यकाळाचा वेध घेण्याची सवय होती. ढेकूळ आणि आपली दोस्ती फार काळ टिकणार नाही. कधीना कधी आपली ताटातूट होणार या कल्पनेनं पानाचा जीव गलबलला. तरीही दोघांचं अस्तित्व असेपर्यंत सहवासाचं सुख आणि प्रेमानं साथ द्यावी या विचारांनं मनातले निराशेचे विचार त्यानं झटकून टाकले. पण म्हणतात ना, संकटं कधी काही सांगून येत नाहीत.

एक दिवस एकाएकी जोराचं वादळ सुरू झालं. वादळाचा वेग प्रचंड होता. दूर अंतरावरची पानं उडत जाऊन हवेत गिरक्या घेऊ लागली. ढेकळाला आपल्या शेजारच्या आणि आवडत्या पानाची चिंता लागली. आपलं प्रिय पान हवेच्या झोकात उडून गेलं तर आपली सोबत कायमची तुटेल या चिंतेनं ते हैराण झालं. क्षणभर काय करावं हे त्याला उमजेना! त्यानं पानाला आपल्या मनातील शंका बोलून दाखविली. पान अनुभवी आणि शहाणं होतं. ते नेहमी सकारात्मक विचार करायचं. ते ढेकळाला दिलासा देत म्हणालं, ‘ढेकूळदादा, तू काळजी करू नकोस. या संकटातून मुक्त होण्यासाठी मी जे सुचवते त्याची अंमलबजावणी कर. करशील ना?’ ढेकळानं होकार भरताच पान म्हणालं, ‘ढेकूळदादा, तू माझ्या अंगावर आपलं वास्तव्य कर. तुझ्या वजनामुळे, वारा मला उडवू शकत नाही. त्यामुळे माझी जागा कायम तुझ्याकडे राहील.’

‘पण हे कसं शक्य आहे. तुला माझं वजन कसं पेलवेल?’ – ढेकळानं चिंता व्यक्त करीत म्हटलं.

‘हे बघ, ढेकूळदादा, तू असला काही विचार करू नकोस. वेळ न दवडता तू माझ्या अंगावर तुझ्या वजनाचा भार ठेव.’

‘ठीक आहे,’ असं म्हणत ढेकळानं आपला मुक्काम पानावर हलवला. ढेकळाच्या वजनानं पानाला उद्भवणारा उडण्याचा धोका टळला. थोडय़ा वेळानं वावटळ शांत झाली. पानाच्या युक्तीमुळे दोघांचा सहवास अटळ राहिला. पानानं ढेकळाचे आभार मानले व पुन्हा दोघं शेजारी राहू लागले.

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एकाएकी वाढला. पावसाचे टपोरे थेंब ढेकळावर पडू लागले. त्यामुळे ढेकळातील मातीचे कण हळूहळू विरघळू लागले. अंगानं लठ्ठ असलेलं ढेकूळ कणाकणानं झिजू लागलं. पानानं त्याची दयनीय अवस्था पाहिली. काहीही करून पावसापासून ढेकळाचा बचाव केलाच पाहिजे अशा निश्चयानं हिम्मत न हारता पानानं ढेकळाला म्हटलं, ‘मागच्या वेळी तू मला जीवदान दिलंस. यावेळी मी तुला जीवदान देणार आहे.’

‘कसं वाचवणार आहेस मला?’ ढेकळानं शंका व्यक्त केली.

‘हे बघ, मी तुझं अंग झाकून टाकणार आहे. पडणारे पावसाचे थेंब मी माझ्या अंगावर झेलून घेईन. म्हणजे पावसापासून तुझं संरक्षण होईल. आता वेळ न दवडता मी तुझ्या अंगावर विसावून तुला पांघरूण घालते,’ असं म्हणत पानानं ढेकळावर संरक्षण करून कवच उभारलं. आता पावसाचे थेंब पान झेलू लागलं. त्यामुळे पाण्याचा थेंबही ढेकळाला स्पर्शू शकला नाही.

थोडय़ा वेळानं पाऊस थांबला. पान व ढेकूळ आनंदानं उद्गारले, ‘एकमेका साह्य़ करू। अवघे धरू सुपंथ।’

बाळांनो, शेजारधर्म पालनाचा उत्तम आदर्श पान व ढेकूळ यांनी घालून दिला आहे. आपणही त्याचं पालन  करू या.

पु. ग. वनमाळी