अर्णव त्याच्या आई-बाबांचा खूप लाडका होता. आई-बाबांनी आणलेली वेगवेगळी खेळणी आणि रंगीबेरंगी पुस्तके यांच्या सहवासात अर्णवचा वेळ अगदी मजेत जाई. बाबांनी आणलेल्या एका पुस्तकात इंद्रधनुष्याचे सुंदरसे छायाचित्र अर्णवने पाहिले. ते छानसे सप्तरंगी इंद्रधनुष्य अर्णवला फारच आवडले. तसे इंद्रधनुष्य प्रत्यक्षात पाहण्याची त्याला उत्सुकता लागून राहिली. तो झोपायला गेला तोही इंद्रधनुष्याचाच विचार करत.
झोपेत स्वप्नांच्या राज्यातून फेरफटका मारताना अर्णवला अचानक समोर एक इंद्रधनुष्य दिसले. त्या विलक्षण तजेलदार रंगकमानीकडे अर्णव काहीसा भारावून बघत राहिला. इतक्यात त्या इंद्रधनुष्याने आपले दोन्ही हात पसरले आणि ते अर्णवला म्हणाले, ‘तुला इंद्रधनुष्य खूप आवडलं ना? मग चल की आमच्या गावात. सगळ्यांना भेटून ओळख करून घे.’
इंद्रधनुष्यांच्या गावात येण्याच्या प्रेमळ आग्रही आमंत्रणापुढे मान तुकवून अर्णव त्या सप्तरंगी कमानीखालून आत शिरला.
आत शिरताच दिसलेल्या दृश्याने अर्णव चकित झाला. चहूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे त्याला वेगवेगळ्या प्रकारची इंद्रधनुष्ये दिसत होती. कोणी आपल्याच आनंदात गाणे गुणगुणत कारंजातल्या पाण्यावर बागडत होते, तर कोणी पावसाच्या थेंबांशी दोस्ती करून त्यांच्याबरोबर झिम्मा खेळत होते. कोणी छतावरच्या झुंबरातल्या लोलकाबरोबर झोके घेत होते, तर कोणी धबधब्यावरून घसरगुंडीचा आनंद लुटत होते.
‘अरे वा! या इंद्रधनुष्यांच्या गावात वेगवेगळी इंद्रधनुष्यं बागडताना बघायला मिळतायत की!’ सभोवतालचे दृश्य पाहून खूश होत अर्णव स्वत:शीच म्हणाला.
बघता-बघता या आनंदरंगी सवंगडय़ांबरोबर अर्णवची गट्टी जमली. एका इंद्रधनुष्याच्या हातात हात गुंफून त्याने गिरक्या घेतल्या, तर दुसऱ्या इंद्रधनुष्याची दोन टोके पकडून त्याने दोरीवरच्या उडय़ा मारल्या. त्यातल्या एका इंद्रधनुष्याला तो म्हणाला, ‘काय मज्जा आहे तुमची! किती विविध रंगांनी तुम्ही तुमचं गाव रंगवलं आहे!’
‘‘याचं सारं श्रेय त्या सूर्यकिरणांना आहे. कारण हे सर्व रंग सूर्याच्या प्रकाशातूनच आम्हाला मिळतात,’’ ते इंद्रधनुष्य म्हणाले.
‘काय सांगतोस!’ अविश्वासाने अर्णव म्हणाला, ‘सूर्यकिरणांचा प्रकाश पांढरा असतो आणि तुमच्यात तर सात रंगांच्या विविध छटा आहेत!’
‘आमचे हे सात रंग सूर्यप्रकाशामध्ये एकत्र गुंफलेलेच असतात. आम्ही फक्त त्यांना अलग करून तुमच्या समोर सादर करतो इतकंच!’ नम्रपणे त्या इंद्रधनुष्याने सांगितले.
‘अलग करून सादर करता म्हणजे?’ अर्णवने विचारले.
‘म्हणजे पाण्याच्या थेंबातून किंवा काचेच्या लोलकातून जाताना वेगवेगळ्या रंगांचे किरण वेगवेगळ्या कोनांतून वाकतात. त्यामुळे थेंबातून बाहेर पडताना ते वेगवेगळ्या दिशांनी जातात आणि वेगवेगळे रंग म्हणून तुमच्या डोळ्यांना दिसतात,’ इंद्रधनुष्याने आपल्या रंगीत गमतीचे गुपित स्पष्ट केले.
‘पण तुमचे रंग नेहमी एका विशिष्ट क्रमानेच का दिसतात?’ अर्णवने विचारले.
‘प्रत्येक रंगाच्या किरणांचा वाकण्याचा कोन वेगवेगळा असतो. त्यामुळे हे रंग नेहमी तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा याच क्रमानं दिसतात,’ इंद्रधनुष्य म्हणाले.
इंद्रधनुष्याशी गप्पा मारता-मारता इंद्रधनुष्याची बॅट हातात धरून अर्णवने पाण्याच्या थेंबाच्या चेंडूचा उंच षटकार मारला. तेव्हा त्या चेंडूने आकाशात आणखी एक नवे इंद्रधनुष्य रेखले आणि आकाशात एकाच वेळी दोन इंद्रधनुष्ये दिसू लागली. गंमत म्हणजे त्यांच्यातल्या रंगांचा क्रम एकमेकांच्या बरोबर उलटा होता. अर्णव हरखून त्या इंद्रधनुष्यांच्या जोडीकडे पाहत राहिला.
‘अरेच्च्या! या दोन इंद्रधनुष्यांमध्ये तर हे रंग एकदा उलट आणि एकदा सुलट क्रमानं दिसतायत!’ अर्णव म्हणाला.
‘हो, यातलं एक इंद्रधनुष्य हे नेहमीसारखं आहे, तर दुसरं इंद्रधनुष्य पाण्याच्या थेंबात सूर्यकिरणांचं दोनदा परावर्तन झाल्यामुळे दिसतं आहे. दोनदा परावर्तन झाल्यामुळेच त्याच्यातल्या रंगांचा क्रम उलटा आहे,’ इंद्रधनुष्याने सांगितले.
‘असं आहे होय! पण मग तिथे त्या रस्त्यावर डबकं आहे. त्यातल्या पाण्यावरही वेगवेगळ्या रंगछटांनी साकारलेलं इंद्रधनुष्य दिसतंय, ते कसं काय?’ अर्णवने विचारले.
‘तिथे पाण्यावर पेट्रोल सांडल्यामुळे एकाच वेळी पेट्रोलच्या आणि पाण्याच्या अशा दोन वेगवेगळ्या पृष्ठभागांकडून प्रकाश परावर्तित होतो आहे. तिथे दोन पृष्ठभागांकडून येणाऱ्या प्रकाशाच्या तरंगांच्या व्यत्ययामुळे असे इंद्रधनुष्यासारखे रंग दिसतायत,’ इंद्रधनुष्याने समजावून सांगितले.
‘कमाल आहे हं तुमची,’ भारावून जाऊन अर्णव म्हणाला.
‘अरे, खरी कमाल आहे शास्त्रज्ञांची!’ कौतुकाने इंद्रधनुष्य म्हणाले, ‘सूर्यप्रकाशात आम्ही सात रंग दडलेले असतो. आम्ही कसे अलग होतो हे तर त्यांनी शोधून काढलंच. शिवाय, कुठल्या पदार्थातून कोणत्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो, यावरून त्या पदार्थात कोणकोणते अणू असतील, हेसुद्धा ते शोधून काढतात.’
‘पण त्याचा काय उपयोग?’ अर्णवला प्रश्न पडला.
‘याचा उपयोग आपल्या शरीरात कोणते रेणू कसं आणि काय काम करतात हे शोधण्यापासून दूरवरच्या ताऱ्यांमध्ये दडलेले अणू कोणते हे शोधण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी होतो. किंबहुना, अणूंच्या रचनेपासून विश्वाच्या रचनेपर्यंत विविध गोष्टींचा शोध घेण्यासाठी रंगछटांचा अभ्यासच उपयोगी पडतो,’ रंगछटांच्या अभ्यासाची महती सांगण्यात इंद्रधनुष्य रंगून गेले होते.
‘अरे वा! म्हणजे हे शास्त्रज्ञ एखाद्या पदार्थाच्या बाह्यरंगाचं बोट धरून त्याचा अभ्यास करत-करत थेट त्याच्या अंतरंगात पोचतात तर! ग्रेट! ग्रेट!’ अर्णव भारावून म्हणाला.
‘ए अर्णव, ऊठ. आणि ‘ग्रेट, ग्रेट’ कोणाला म्हणतोयस?’ बाबा अर्णवला उठवत म्हणाले.
डोळे चोळत अर्णव उठला. बाबा त्याच्याकडे पाहत म्हणाले, ‘पटकन ऊठ. बाहेर किती सुंदर इंद्रधनुष्य दिसतंय, बघ.’
अर्णव खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, ‘बाबा, हे सप्तरंगी इंद्रधनुष्य मस्त आहे, हे खरंच. पण रात्री स्वप्नात येऊन इंद्रधनुष्याने मला त्याच्या अंतरंगातल्या ज्या गमती सांगितल्या त्या तर त्याहूनही रंगतदार आहेत..!’

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’