|| मुक्ता चैतन्य

आईच्या फोनमधल्या व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्ही मित्रमत्रिणींशी चॅटिंग करता ना? आई-बाबा दोघंही घरी असले तरी सतत व्हॉट्सअ‍ॅप तपासत असतात ना? मग त्यांचं बघून तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅप बघावं, आपल्या मित्रमत्रिणींचाच ग्रुप करावा, त्यांच्याशी गप्पा माराव्यात असं वाटत असणार. आई-बाबा, आजी-आबा सतत व्हॉट्सअ‍ॅपवर असताना ती गोष्ट तुम्हालाही करावीशी वाटणं खूपच स्वाभाविक आहे.

तुमच्यापकी काही जणांनी टीनएजमध्ये प्रवेश केला असेल. म्हणजे, तेरा-चौदा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे! तुमच्याकडे स्वत:चा फोन असेल. त्यावर व्हॉट्सअ‍ॅप अर्थात असणारच. शाळा, क्लास यांच्या अभ्यासापासून इतरही अनेक गोष्टींचं तुम्ही शेअिरग करत असणार. फॉरवर्ड फॉरवर्डचा खेळही मोठय़ांसारखा तुम्हीही खेळत असणार. एखाद्या मित्र किंवा मत्रिणीकडून आलेला मेसेज तुम्हीही पुढे कुणाला तरी पाठवत असणार. पण तुम्हाला माहीत आहे का, व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा प्रत्येक मेसेज खरा नसतो.

आपल्या समाजात असेही लोक आहेत, ज्यांना समाजातली शांतता बघवत नाही. समाज म्हणजे आपण सगळे सुखाने, शांततेत वावरतोय, कुणी कुणाला त्रास देत नाहीये- कुणाचं कुणाशी भांडण नाहीये हे या लोकांना बघवत नाही. त्यांना म्हणतात समाजकंटक. तर हे समाजकंटक समाजात अशांतता निर्माण व्हावी यासाठी खोटी माहिती आणि बातम्या पसरवत असतात. मुलांना पळवणारी टोळी आली आहे, अमुक एक करा म्हणजे तुमच्या घरातल्या मुलांना धोका नाहीये, किंवा असलं काहीही! आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आई-बाबांचं लक्ष असेलच, पण तरीही आपण जबाबदार व्हायला हवं. आपण स्मार्ट फोन वापरणार, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरणार, तर त्या वापराची जबाबदारीही आपलीच आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल, ‘ताई, जबाबदारी घ्यायची म्हणजे करायचं काय?’

  • तर अफवा, खोटय़ा बातम्या पसरवणारे मेसेजेस तुमच्या ग्रुप्सवर कुणी पाठवले तर त्याबद्दल आई-बाबांना विचारा. असे मेसेजेस लगेच पुढे पाठवू नका. म्हणजे फॉरवर्ड करू नका.
  • आई-बाबांनाही त्याबद्दल काही माहीत नसेल तर ते माहिती काढेस्तोवर थांबा.
  • माहिती मिळाली नाहीच तर मेसेज डिलीट करा, पण फॉरवर्ड करण्याची घाई करू नका.
  • फॉरवर्ड करायला एक सेकंद लागतो, पण तो मेसेज जर खोटा असेल, अफवा असेल तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात.
  • मुळात खोटय़ा बातम्या पसरवण्यात आपण सहभागी व्हाच का, नाही का?
  • अनेकदा आपल्याला आपल्या मित्रमंडळींची सिक्रेट्स माहीत असतात. एकमेकांना चिडवण्याच्या नादात या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर ती सिक्रेट्स सांगितली जातात. स्लिप ओव्हर्सना व्हिडीओ काढलेले असतात ते शेअर केले जातात. समजा, ते तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मत्रिणीने ग्रुपबाहेर शेअर केलं तर? लक्षात घ्या, एकदा एखादा व्हिडीओ, फोटो ऑनलाइन गेला की तो कायम ऑनलाइन असतो. तो तुम्ही ग्रुपवरून डिलीट केलात, फोनमधून काढून टाकलात तरी प्रत्यक्षात तो डिजिटल जगातून डिलीट होत नाही. त्यामुळे असं शेअिरग करू नका.
  • एखादा मित्र किंवा मत्रीण स्वत:ला काहीतरी इजा करून घेण्याबद्दल चॅटिंगमध्ये बोलत असेल तर ते हसण्यावारी न नेता, मोठय़ांच्या लक्षात आणून द्या. तुमच्या मित्राला-मत्रिणीला काही मदत हवी असेल तर ती लगेच करा.

आपण ऑनलाइन जगात वावरतो, आपले आई-बाबा मोठय़ा हौसेने आपल्याला स्मार्ट फोन घेऊन देतात, तर आपणही आपली जबाबदारी उचललीच पाहिजे.

मोठं होणं म्हणजे काही फक्त हातात गॅझेट मिळणं नसतं. मोठं होणं म्हणजे जबाबदार होणं. मग होणार ना जबाबदार? घेणार ना काळजी?

अडोरा स्विटक

आम्ही मोठी माणसं लहान मुलांकडून खरं तर खूप शिकू शकतो. आम्हा मोठय़ांना उगाच वाटत असतं की, सगळं फक्त आम्हाला कळतं. असं नसतंच मुळी! आलं ना खुद्कन हसू. अडोरा स्विटक ही सात वर्षांची होती तेव्हा तिने ब्लॉगिंगला सुरुवात केली. आज ती टीनएजर आहे. ती म्हणते, ‘मोठे आम्हा लहान मुलांकडून खूप काही शिकू शकतात.’ ती अमेरिकाभर भाषण देत फिरत असते.

ती सांगते, ‘मुलांनी काय केलंय विचारता? काय केलं नाहीये ते विचारा. अ‍ॅनी फ्रँकने लाखो लोकांना तिच्या डायरीतून सत्याची जाणीव करून दिली. अमेरिकेच्या रुबी ब्रिजेसने संयुक्त संस्थानातील विषमता दूर करण्यास मदत केली, तर चार्ली सिम्पसनने हैतीसाठी १२०,००० पाउंड मदत गोळा केली, तेही त्याच्या छोटय़ा सायकलवरून. तर- मुलं मोठय़ांना वाटतं त्यापेक्षा खूप काही करू शकतात.’ मलाही असंच वाटतं. तुम्हा मुलांमध्ये वेगळं काहीतरी घडवण्याची प्रचंड ऊर्जा आहे. तिचा शोध घेऊया का? अडोरा, अ‍ॅनी फ्रँक, रुबी ब्रिजेस आणि चार्ली सिम्पसन या सगळ्यांची माहिती तुम्हाला नेटवर मिळेल. ती काढा. वाचा. तुमच्या मित्रमत्रिणींना सांगा. अडोराचा व्हिडीओ तुम्ही या  https://www.ted.com/talks/adora_svitak/transcript लिंकवर बघू शकता.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)