उन्हाळय़ाची सुट्टी संपली. शाळा सुरू झाली आणि लवकरच आमच्या लक्षात आलं, की आमच्या नवीन टीचर- ‘मिस बी’ (ब्रेमन मॅडमना त्यांच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं हे लाडकं संबोधन होतं.) सगळेच विषय छान शिकवीत असत.  त्या आम्हाला गणित नुसतं चांगलं शिकवून थांबत नसत, तर पुस्तकातलं गणित जास्ती सहज करून शिकवायला वेगवेगळय़ा गमतीजमती करीत.
आम्ही जेव्हा बेरीज आणि वजाबाकीची फॅक्ट फॅमिली (बेरीज-वजाबाकी किंवा गुणाकार-भागाकार करताना वापरल्या जाणाऱ्या तीन नंबरांची जागा बदलून उत्तरं काढताना मुलांना गणित मनोरंजक वाटतं आणि चांगला सरावही होतो.) शिकलो, तेव्हा मिस बी म्हणाल्या, ‘‘मुलांनो, तुम्हाला आई-बाबा आठवडय़ाला जे पैसे देतात ना पॉकेटमनी म्हणून, त्याचा उपयोग करून फॅक्ट फॅमिलीवर गोष्ट लिहा. लिहिताना भाषेकडे लक्ष असू दे आणि मनोरंजनाकडेही!’’
‘‘पण मिस बी, मला पॉकेटमनी मिळतच नाही.’’ मी गोष्ट लिहिण्यापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात होते.
‘‘निकोल, मग तर तुला कल्पनाशक्तीचा छान उपयोग करता येईल.’’ ‘अनुभवी’ बाईंनी मला सुचवलं. आता आईची मदत घेण्याचं मी ठरविलं. बाहेर गेलेली आई जेव्हा घरी आली तेव्हा मला म्हणाली, ‘‘निकोल, जेनी आणि टीनाला बोलाव गं जरा. ‘ट्रिक ऑर ट्रीट’साठी तुमचे तिघींचे कॉस्च्युम्स आणलेत मी.’
अमेरिकेत हॅलोविन साजरा करतात. मुलं चित्रविचित्र कपडे घालून, हातात विविध आकारांच्या परडय़ा घेऊन संध्याकाळी पालकांच्या सोबतीने शेजारीपाजारी ‘ट्रिक ऑर ट्रीट’ला (खाऊ द्या, नाही तर आमच्या खोडय़ा चालवून घ्या!) जातात. जिथे जातात, तिथे त्यांना खाऊ नाही तर पैसे मिळतात.)
‘‘युरेका!’’ मी आनंदाने ओरडले. माझ्या गणित गोष्टीला मला छानसा विषय मिळाला होता ना! ट्रिक ऑर ट्रीटला मिळणाऱ्या पैशांनी माझी गणिताची गोष्ट आकार घेणार होती.
हॅलोविनची संध्याकाळ आली. ट्रिक ऑर ट्रीटला जायची तयारी सुरू झाली. जेनी- माझी मोठी बहीण व्हँपायर झाली होती. मी झाले होते विच म्हणजे चेटकीण आणि टीनाबेबी झाली होती मनीमाऊ. आमच्या तिघींच्या हातात आमची ‘कमाई’ ठेवायला छोटय़ा परडय़ा होत्या.
दमलेल्या पायांनी, पण उल्हसित मनाने आम्ही घरी आलो. प्रत्येकीच्या परडीत चक्क नोटा होत्या डॉलरच्या. (नाही म्हणायला थोडी चॉकलेटं आणि गोळय़ाही होत्या.) माझ्या परडीतले पैसे मोजल्यावर ते १५ डॉलर्स भरले. (मामा आणि मावश्या जवळच राहतात, हे किती छान!) मी माझे जमविलेले पैसे एका छोटय़ाशा पर्समध्ये ठेवीत असे. ट्रिक ऑर ट्रीटहून आल्या आल्या मी पर्स काढली आणि त्यातले ३९ सेंट्स बाजूला ठेवले. दुसरा ‘ढीग’ आजच्या मिळकतीचा! मग एक पेपर घेऊन त्यावर माझ्या बेरीज आणि वजाबाकीच्या फॅक्ट फॅमिलीचं पहिलं पान लिहिलं.
$१५.००+ $०.३९ = $ १५.३९
$०.३९ + $१५.०० = $ १५.३९
$१५.३९ – $ ०.३९ = $१५.००
$१५.३९ – $१५.०० = $ ०.३९
आमच्या ट्रिक ऑर ट्रीटच्या दिवसाचा शेवट खूपच वेगळा आणि गोड असतो. आजोबा आणि आजी शेजारीच राहतात. आपापल्या खास कपडय़ांमध्ये आणि मेकअपमध्ये आम्ही त्यांची सगळी नातवंडं आणि आमचे आई-बाबा त्यांच्या घरी जातो. जेवणापूर्वी आजी- आजोबा आणि इतर सर्वाच्या पुढे आम्ही आपले कॉस्च्युम्स म्हणजे खास कपडे सांभाळत मिरवणुकीने जातो. मग आजी सगळय़ांचं कौतुक करून पहिल्या नंबरचं बक्षीस जाहीर करते. आज ध्यानीमनी नसताना ‘‘किती देखणी ही चेटकीण!’’ असं म्हणत माझं कौतुक करत आजीने २० डॉलर्सची नोट माझ्या हातात ठेवली. आजीच्या पाया पडून मी तिच्याकडून नम्रपणे पैसे घेतले. घरी परत आल्यावर मी माझी पर्स काढली आणि सर्व पैसे मोजून माझ्या गोष्टीचं दुसरं पान लिहिलं.
$१५.३९ + $२०.०० = $३५.३९
$२०.०० + $१५.३९ = $३५.३९
$३५.३९ – $२०.०० = $१५.३९
द्द्र३५.३९ – द्द्र१५.३९ = $२०.००
शुक्रवारी मी आजोबांना फोन करून त्यांचा ‘शनिवारचा काही प्लॅन आहे का कुठे जाण्याचा?’ असं विचारलं.
आजोबा आम्हा नातवंडांना ‘नाही’ म्हणूच शकत नाहीत. शनिवारी आम्हा तिघी बहिणींना आणि आजीला घेऊन आजोबा आईस्क्रीमच्या दुकानात गेले. आई-बाबाही आले. मी माझे पैसे बाबांना देऊन ठेवले होते. माझ्या पैशांनी ही पार्टी होती. उरलेले पैसे घरी आल्यावर बाबांनी मला परत दिले. शनिवारची संध्याकाळ फारच छान गेली होती. झोप आवरत मी गोष्टीचं पुढचं पान लिहिलं.
$३५.३९ – $२३.५४ = $११.८५
$३५.३९ – $११.८५ = $२३.५४
$२३.५४ + $११.८५ = $३५.३९
$११.८५ + $२३.५४ = $३५.३९
रविवारी सकाळी मी आंद्रेयाला- माझ्या लाडक्या मामेबहिणीला ‘दुपारी माझ्याबरोबर वेळ घालवायला आवडेल का?’ म्हणून विचारलं. ती ‘हो’ म्हणाली. बाहेर जाताना मी फक्त ११ डॉलर्स काढून घेऊन ८५ सेंट्स परत पर्समध्ये ठेवून दिले. दरवेळी ‘उसने’ घेऊन बेरीज-वजाबाकी करायचा मला अगदी कंटाळा आला होता.
आईने मला आणि आंद्रेयाला सिनेमा थिएटरवर नेऊन सोडले. मी आमची दोघांची तिकिटं काढली. आंद्रेयाने दोघींकरिता पॉपकॉर्न घेतले. मूव्ही मस्त होती. आई आम्हाला न्यायला वेळेवर आली. तिने मग आम्हाला एका तासाकरिता मॉलमध्ये सोडलं.
मॉलमध्ये मी आंद्रेयाला आणि मला फुलपाखरं असलेल्या केसांच्या पिना घेतल्या. मला स्वत:ला मी एक लांब पेन्सिल आणि कांकणही घेतले. आंद्रेयाने मला आणि स्वत:ला एक-एक लॉलीपॉप घेतले. स्वत:च्या पैशांनी स्वत:करिता खरेदी करण्यात गंमत येत होती. माझ्या बहिणींना मी विसरले नव्हते. माझे उरलेले चार डॉलर्स मी त्यांच्यासाठीच ठेवले होते. गरीब मुलांच्या मदतीकरिता आम्ही मुलं शाळेने दिलेली चॉकलेटं विकतो. माझ्याकडच्या पेटीत चार चॉकलेटचे बार अजून शिल्लक होते. मी माझ्याजवळच्या चार डॉलर्सनी ते चार बार विकत घेणार होते. माझ्या दोघी बहिणी, मी आणि आंद्रेया- चार चॉकलेट बारचा हिशोब मी मनात कधीच करूच ठेवला होता.
माझ्या गोष्टीचं शेवटचं पान मी आता लिहिलं.
$.३९ + $.४६ = $८५
$.४६ + $३९ = $८५
$८५ – $४६ = $३९
$८५ – $३९ =  $४६
माझ्या लक्षात आलं, की माझ्या पर्समध्ये सुरुवातीचे ३९ सेंट्स परत ठेवल्यावर माझ्याकडे ४६ सेंट्स शिल्लक होते. मिस बींच्या टेबलावर एक ‘पेनी जार’ आहे. त्यात वर्गणी जमा केलेली सेंटची नाणी आहेत. मी बरणीत माझी नाणी टाकली. माझ्या आई-बाबांना, बहिणींना माझं नेहमीच खूप कौतुक वाटतं. मिस बींना मी माझे पैसे माझ्या माणसांसाठीसुद्धा खर्च केले आणि चांगली गोष्ट लिहिली म्हणून आनंद झाला. मला माझ्या गोष्टीकरता ‘ए’ मिळाला.