डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

पुणे हे टेकडय़ांनी वेढलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. विशिष्ट व सुंदर असा भौगोलिक वारसा मिळालेल्या या शहरातल्या आयुष्यात साहजिकच टेकडीवर फिरायला, मॉर्निग वॉकला जाणं, ट्रेकिंग करणं या गोष्टी नेहमीच पाहायला मिळतात. सिंहगडही जवळ असल्याने तिथेही ट्रेकिंगचं काहीसं अवघड स्तरावरचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. एवढंच कशाला, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ट्रेकिंगच्या स्पर्धासुद्धा इथे रुजल्या आहेत.

अशाच एका ट्रेकिंग स्पर्धेच्या वेळची गोष्ट. त्या स्पर्धेत पाच जणांच्या समूहाने साधारण दहा कि. मी. अंतर चढ-उतार करत कापायचं होतं. तेही रात्रीच्या मिट्ट काळोखात. माझे मित्र-मैत्रिणीही त्यात सहभागी झाले होते. रवी, प्रिया, नील आणि शबाना. त्यांच्यासोबत एक जवळच्याच गावातला मुलगा शंकर हा गाइड म्हणून होता. त्यांची सफर रात्रीच्या जेवणानंतर सुरू झाली. हळूहळू रस्ते व शहरातल्या दिव्यांचा उजेड मागे पडू लागला. काळ्याकुट्ट अंधारात टॉर्चच्या मदतीने प्रवास सुरू होता. चार-पाच तासांचा हा प्रवास होता. त्यामुळे प्रत्येकाने खाण्यापिण्याच्या पदार्थासोबतच इतरही नानाविध गोष्टी जय्यत तयारीनिशी आणल्या होत्या. तीन तास उलटून गेले, पण दोन तासाने जी चेकपोस्ट दिसणं अपेक्षित होतं ती अजून आली नव्हती. शंकरला आता शंका आली की आपण बहुतेक रस्ता चुकलो आहोत. त्याने ही शंका बोलून दाखवताच त्या गटातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. प्रिया आणि नील घाबरले. ‘‘मला वाटलंच होतं, रात्रीचा ट्रेक करायला नाही जमणार आपल्याला. आता काय करायचं? आपलं काय होणार आता?’’ अगदी रडकुंडीला येऊन नील म्हणाला. त्याच्या मनात नाना विचारांनी गर्दी केली. ‘‘इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला पकडून डांबून ठेवलं तर मला घरी जायला नाही मिळणार. माझे आई-बाबा किती दु:खी होतील. मलापण त्यांची आठवण येईल. मग माझी इथून कधीच सुटका नाही होणार..’’ आता मात्र त्याला खरंच रडू कोसळलं. प्रियानेही त्याला साथ दिली. शबाना म्हणाली, ‘‘रवी, तू या दोघांना सांभाळ. मी आलेच.’’ ती पलीकडे चुकलेल्या वाटेचा अदमास घ्यायला गेलेल्या शंकरपाशी गेली.

‘‘शंकर, आपण खरंच वाट चुकलोय का रे?’’

‘‘ताई, अवं मलापन खरं तर कळत न्हाई कसं काय, पण ो भाग मुळीच वळखीचा वाटत न्हाई ओ. वाट चुकलीच हाये.’’

‘‘बरं.. चल, मिळून काहीतरी मार्ग शोधू या.’’

‘‘चला..’’ असं म्हणून शंकर शबानासोबत पुन्हा नील, प्रिया व रवीकडे आले. नील व प्रिया एव्हाना शांत झाले होते. शबानाने त्यांना धीर देत म्हटलं, ‘‘मित्रांनो, काय काय भयानक घडेल याची कल्पनेतच चित्रं रंगवण्यापेक्षा आपण जर यातून मार्ग कसा काढायचा याचा विचारला केला तर?’’

‘‘खरंच विचार करू या.’’ रवीलाही उत्साह आला.

‘‘व्हय.. वाईट ईचार करन्यापाई अशी डोक्याची वाट पकडनं बरं!’’ शंकर म्हणाला.

‘‘रस्ता चुकलोय हे तर खरंच, पण आता आपल्याला बरोबर रस्त्याकडे जायचंय. म्हणजे आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं हे आधी ठरवायला हवं.’’ शबानाने सुरुवात केली.

नीलने विचारलं, ‘‘कुठे पोहोचायचं हे कसं ठरवू शकतो आपण?’’ त्याला आता कोणत्या दिशेनं प्रश्न विचारले पाहिजेत याचा अंदाज आला.

प्रियाने पटकन् तिच्या पाठीवरच्या सॅकमधून स्पर्धेचं माहितीपत्रक काढलं. त्यात या मार्गाचा नकाशा होता. त्यावर मधे मधे असलेल्या चेकपोस्टचीसुद्धा माहिती होती.

‘‘यातली कोणती जागा तुला ओळखीची वाटते शंकर?’’ तिने चेकपोस्टची यादी दाखवत शंकरला विचारलं. ‘‘हे हनुमान मंदिर ठावं हाय मला चांगलंच. नदीच्या काठावर हाय. या मंदिराच्या पल्याडली चौकी गाठू शकतो आपण.’’

‘‘क्या बात है शंकर! चला नदीकडे.’’ प्रिया उठून चालायला निघाली.

‘‘अगं, पण नदीपर्यंत कसं पोहोचायचं?’’ रवीच्या विचारांनाही आता चालना मिळाली.

‘‘कम्पास आहे माझ्याकडे..’’ नीलने पटकन् स्पर्धेसाठी घेतलेला नवा कम्पास काढला.

‘‘सांग शंकर.. कोणत्या दिशेला आहे नदी? मी घेऊन जातो तुम्हा सगळ्यांना.’’ त्याला आता या साहसी प्रसंगाची मजा यायला लागली होती.

‘‘नील, कम्पास तेव्हाच उपयोगात येणार, जेव्हा आपल्याला माहिती असेल की आपण नेमके कुठे आहोत. पण आपल्याला तेच तर माहिती नाहीए ना?’’ शबानाने आठवण करून दिली.

‘‘मग आता? कसं होणार आपलं?’’ प्रियाला पुन्हा चिंता वाटू लागली.

‘‘अवं प्रियाताई, शबानाताई म्हनत्यात तसं दुसरा चांगला प्रश्न विचारा बगा. दुसरा कंचा उपाय हाये नदीपाशी पोचायचा?’’

‘‘अरे हो शंकर.. बरोबर. कोणत्या गोष्टी आपल्याला नदीची दिशा दाखवू शकतात बरं?’’- प्रिया.

‘‘आयडय़ा!’’ शंकरलाच एक कल्पना सुचली. ‘‘अवं, इथं आसपासच्या गावची गुरं नदीपाशी नेत्यात चरायला रोज. आपल्या वाटेत त्यांची पावलं उमटलेली असत्याल. त्या ठशांच्या मागनं मागनं गेलो तर पोचू की नदीकडंला. मग तिथनं पुढं कामी यील नीलभाऊंचा कम्पास.’’

‘‘वा! चला.. चालायला लागूयात सगळे.’’ शबानालासुद्धा हायसं वाटलं. पाचही जण आता नव्या जोमात चालायला लागली. बघता बघता नदीजवळ पोहोचले. आता पुढचा प्रश्न आला.. नदीच्या काठानं चालायचं तर ठरलं होतं.. पण कोणत्या दिशेला? डावीकडे की उजवीकडे?

नीलचा कम्पास आता कामी आला. जेवढा वेळ त्यांना हरवण्याच्या आधी चालायला लागला होता त्याच्या अंदाजानं त्यांनी दक्षिण दिशेला- म्हणजेच त्यांच्या अंतिम ध्येयाच्या दिशेनं जायचं ठरवलं. कारण ठरलेली हनुमान मंदिराजवळची चेकपोस्ट बऱ्यापैकी लांब होती. ती इतक्या कमी वेळात त्यांच्याकडून पार झाली नसावी असा त्यांनी तर्क केला. कम्पासच्या मदतीनं नदीच्या किनाऱ्यावरून चालता चालता झुंजुमुंजु झाल्याची जाणीव झाली. थोडं पुढे गेल्यावर दुरून मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू येऊ लागला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नीलने तर अक्षरश: मंदिराच्या दिशेने धूम ठोकली. मंदिरापाशी पोहोचल्यावर दोन क्षण सगळ्यांनी विश्रांती घेतली. तिथल्या मंदिराच्या कठडय़ापाशी जाऊन रवीने पाहिले, तर त्याला स्पर्धेची चेकपोस्ट अगदी जवळच असलेली दिसली. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दोन माणसं तिथे तंबूच्या बाहेरच बसली होती.

आपण स्वत:हून या अनोळखी ठिकाणी अवघड परिस्थितीतून साहसाने मार्ग काढल्याचा अभिमान सगळ्यांच्याच थकलेल्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होता.

त्यांच्याकडून हा किस्सा ऐकल्यानंतर शबानाची ही योग्य वा सकारात्मक प्रश्न विचारायची कल्पना मला मनापासून पटली.

मित्रांनो, याचं कारण आपलं अफाट मन आणि अमर्यादित गोष्टी साठवू शकणारा आपला मेंदूच आहे.

आपल्या मेंदूचा हा आणखी एक अद्वितीय गुणधर्म आहे की, आपण विचारलेल्या प्रश्नांच्या दिशेनेच तो आपल्याला पुढे नेतो. कारण आपल्या खोलवर असणाऱ्या अंतर्मनात सर्व प्रकारची माहिती, अनुभव, पाहिलेल्या-ऐकलेल्या असंख्य गोष्टी साठवलेल्या असतात. थोडक्यात- तिथे सर्वच प्रश्नांची उत्तरं विस्ताराने उपलब्ध असतात. आपण एखाद्या प्रसंगी कसा विचार करतो, कशी कृती करतो आणि त्याचे परिणाम काय होतात, ते ठरते आपण या मनाला विचारलेल्या प्रश्नांवर. मनात साठलेल्या या सर्व प्रकारच्या माहितीपैकी कोणत्या प्रसंगात कोणती माहिती वापरायची, ही निवड आपल्याला करता येणे म्हणजेच स्वत:ला उत्तम प्रश्न विचारणे. कठीण प्रसंगी नकारात्मक प्रश्न विचारला तर माहितीसुद्धा नकारात्मकच मिळेल. (जशी नीलला सुरुवातीला गावातल्या लोकांनी डांबून ठेवण्याची भीती वाटली होती.) आणि चांगले, सकारात्मक प्रश्न विचारले तर कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा योग्य तो मार्ग व सकारात्मक माहितीसुद्धा मिळते. (जसा माझ्या मित्रमैत्रिणींना नदीकडे जाण्याचा रस्ता सापडला.) उत्तरापेक्षा योग्य प्रश्न स्वत:ला विचारणं हे हजार पट जास्त महत्त्वाचं असतं, हे आता लक्षात आलं ना?

स्वत:च्या मनाला योग्य प्रश्न विचारणं हे तत्त्व आपल्याला अभ्यास, खेळ, मैत्री, घर, नाते, कलागुण असे सगळीकडेच वापरता यायला हवं. तुम्ही कुठे कुठे वापरणार ही प्रश्नांची ताकद, हे मला नक्की कळवा.