News Flash

..आणि हत्तीला सोंड मिळाली

मुलांनो, आपल्याकडे जसे हत्ती आढळतात तसेच ते अफ्रिकेतही आहेत बरं का!

|| ज्योती देशपांडे

मुलांनो, आपल्याकडे जसे हत्ती आढळतात तसेच ते अफ्रिकेतही आहेत बरं का! त्यांच्याकडचे हत्ती आपल्या हत्तीपेक्षा थोडे मोठे आणि थोडेसे वेगळे असतात. तिकडच्या जंगलात हत्तीचे मोठमोठे कळप एकत्र राहतात.

अफ्रिकेतल्या लोककथेनुसार, फार पूर्वी हत्तीला म्हणे आजच्यासारखी लांब सोंड नव्हतीच. त्याचे त्याच जागी छोटेसे नाक होते. बाकी कान वगैरे सगळे मोठे. देहसुद्धा आजच्यासारखाच अजस्त्र. फक्त फरक काय तो सोंडेचा. मग हे लांब नाक, सोंड आली कशी?

त्याचं झालं असं, अफ्रिकेच्या जंगलातले हे हत्तीचे मोठमोठे कळप जंगलातील जवळच्या नदीवर पाणी पिण्यासाठी जात असत. एकदा असेच ते पाणी पिऊन येत असताना त्यांच्यातील एक छोटे पिल्लू मात्र अजून नदीत पाणी पीतच होते. तेवढय़ात नदीतल्या एका मोठय़ा मगरीने ते पाहिले. त्याला पाहून मगर एकदम खूश झाली.  ‘चला आज मस्त जेवण होणार,’ या विचाराने तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि पिल्लू पाणी पितानाच तिने त्याला पकडायचा प्रयत्न केला. परंतु पिल्लाला तिची चाहूल लागताच ते मागे सरकू लागले. पण तरीही मगरीने त्याचे नाक पकडलेच आणि त्याला जोरात ओढू लागली. हत्तीचे पिल्लू प्रतिकार करत जोरात मागे सरकू लागले. पण परत मगरीने त्याला जोरात ओढले. पण पिल्लू चिवटपणे प्रतिकार करत मागे येत होते. असे मगरीने पुढे ओढण्यात तर हत्तीने मागे सरकण्यात हत्तीचे नाक लांब होत गेले; आपल्या कळपातील एक पिल्लू मागे राहिले हे पाहून सगळे हत्ती नदीकाठावर जमा झाले. हत्तीचे आणि मगरीचे हे भांडण आणि झटापट पाहताना सारे हत्ती पिल्लाला मागे येण्यास प्रोत्साहन देऊ लागले. ओरडू लागले. ‘‘बक अप – मागे ये, ‘‘मागे खेच स्वत:ला’’.. असे चिअर अप करणारे हत्ती बघून पिल्लाने खूप नेट लावला. पण तेवढय़ात मगरीनेही त्याला जोरात ओढले, आता मगर जिंकते की काय असे वाटत असतानाच हत्तीने जोरात हिसका देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. पण या खेचाखेचीत त्या हत्तीचे नाक भलतेच लांब झाले. सुरुवातीला इतर हत्ती कुजबुजत त्याची थट्टा करू लागले. पण लवकरच इतर हत्तींच्या लक्षात आले की ‘‘अरे, याला या लांब नाकाचा म्हणजेच सोंडेचा चांगलाच उपयोग होत आहे. एरवी एवढय़ा मोठय़ा प्राण्यास बसून पाणी पिणे, उठणे, बसणे खूप अवघड जाई. पण आता खालचे गवत पाय न वाकवता सहज सोंडेने उचलून तोंडात टाकता येऊ लागले. पाणी पिणे सहज सोपे झाले. इतकेच काय, पण तळ्यातले पाणी सोंडेत घेऊन फवारा उडवत छान अंघोळीची मजा त्याला घेता येऊ लागली. आता इतर हत्तींना त्याचा हेवा वाटू लागला. ‘आपल्यालाही असे लांब नाक (सोंड) मिळाले तर मजा येईल.’ मग सोंड मिळण्याच्या आशेने काही हत्ती त्या नदीत- मगर येईपर्यंत हळूहळू पाणी प्यायचे. मगरही ‘आता तरी या हत्तीला पकडूच,’ म्हणून हत्तीला पकडून खाण्यासाठी ओढायची. तिने नाक पकडून ओढायला सुरुवात करताच हत्ती स्वत:ला मागे खेचायचे. असे पुढे मागे खेचण्यात हत्तींची नाके लांब होत होत त्यांना सोंड मिळाली. असे बरेच दिवस चालले आणि बहुतेक वेळा हत्तीच जिंकले. मग बऱ्याच हत्तींना अशी लांब नाके म्हणजेच सोंड मिळाली. आणि त्यानंतर बऱ्याच हत्तींना अशी  सोंड मिळाल्यावर पुढे जन्मणाऱ्या सर्व हत्तींच्या पिल्लांना आजच्यासारखी सोंड जन्मजात मिळाली. तेव्हापासून साऱ्या हत्तींना सोंड असते बरं!

(आफ्रिकन लोककथा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 2:41 am

Web Title: stories for kids 5
Next Stories
1 घरच्या घरी इमोजी करा तयार!
2 रॉबिनच्या गळ्यातली घंटा
3 डोकॅलिटी
Just Now!
X