डॉ. नंदा संतोष हरम

nandaharam2012@gmail.com

‘‘आई, बॅग भरून झाली का गं माझी? तुझं होईपर्यंत मी खेळायला जाऊ का अनन्याकडे?’’ जाई बेडरूममधून तिच्या आईला ओरडून विचारत होती. ती बॅग भरत असताना तिची आई आणि आजी काही तरी बोलत होत्या. पण तिला नेमकं काही कळलं नव्हतं. ती आता तिच्या दुसऱ्या आजीकडे जाणार होती ना.. तिथे काय काय करायचं, याचाच विचार तिच्या डोक्यात चालू होता. एवढय़ात नॅपकिनला हात पुसतच आई बाहेर आली अन् म्हणाली, ‘‘जाई, आता तुला आजीकडे जायला नको. या आजीची ट्रिप कॅन्सल झाली.’’ जाई गोंधळून गेली. तिला कळेच ना, आजीची तर सगळी तयारी झाली होती. विचारांचा गोंधळ बाजूला सारत ती म्हणाली, ‘‘आई, ट्रिप का रद्द झाली? आजीला बरं वाटत नाही का?’’ आई म्हणाली, ‘‘नाही गं बबली. आजीची तब्येत चांगली आहे, पण या करोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय ना! संसर्ग पसरायला नको म्हणून ही खबरदारी.’’

‘‘आई, मला सांग ना नीट या कोरोना व्हायरसबद्दल. सगळीकडे याचीच चर्चा आहे.’’ जाईची उत्सुकता बघून आईला बरं वाटलं. पण आई तिला मुद्दामच म्हणाली, ‘‘अगं, पण तुला खेळायला जायचंय ना.’’

‘‘नाही. आई, आधी मला सारं सांग या व्हायरसविषयी, मग जाईन मी खेळायला.’’ आई विचारात पडली. नेमकी कुठून सुरुवात करू? बरं, जाईला कळेल असंच तिला सांगायला हवं ना! तिला युक्ती सुचली. ती जाईला म्हणाली, ‘‘बेटा, तूच प्रश्न विचार. त्याला मी उत्तरं देईन.’’

‘‘बरं, आधी मला सांग, व्हायरस म्हणजे काय? तो कसा असतो?’’

‘‘जाई, विषाणू अत्यंत सूक्ष्म असतो. तो बघण्याकरिता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे अतिशय संवेदनशील सूक्ष्मदर्शकाची गरज भासते. त्याची गंमत अशी आहे बाळा, की त्यात ठरावीक अशी पेशीरचना नसते.’’

‘‘आई, आठवलं.. पेशी म्हटली की तिच्यात वेगवेगळे घटक असतात ना, जसे की पेशीपटल, पेशीभित्तिका, पेशीरस, केंद्रक.’’

‘‘हो, हो, बरोब्बर सांगितलंस. असे घटक या विषाणूमध्ये नसतात. विषाणूंभोवती प्रथिनांचं आवरण असतं आणि त्यामध्ये डीऑक्सिरायबो न्युक्लिक अ‍ॅसिड (डीएनए) किंवा रायबो न्युक्लिक अ‍ॅसिड (आरएनए) असतात. हे विषाणू घातक असतात, कारण ते वनस्पती आणि प्राण्यांमध्ये रोग निर्माण करतात.

‘‘आई, मग जिवाणू (Bacteria) या विषाणूंपासून वेगळे कसे आहेत?’’ जाईने अशी विचारणा करताच तिची आई खूश झाली.

‘‘चांगला प्रश्न आहे जाई! विषाणूंपेक्षा मोठे असतात, पण सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत. ते एकपेशीय आहेत. याचा अर्थ काय, की याच्यात पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीरस हे सर्व घटक असतात. फक्त फरक असा की, यात केंद्रक नसल्यामुळे गुणसूत्रे मुक्त असतात. आईचं बोलणं संपताच जाई म्हणाली, ‘‘या जिवाणूंपासूनही रोग होतात का?’’

‘‘जाई, सगळेच जिवाणू उपद्रवी नसतात, काही तर उपकारक असतात.’’

‘‘कोणते गं?’’ जाईने भाबडेपणाने विचारलं.

आई सांगू लागली, ‘‘जाई, दुधाचं दह्यत रूपांतर हे जिवाणूच करतात. आपल्या पोटातही जिवाणू असतात- जे अन्नपचनाकरिता मदत करतात.’’

‘‘आई, हा कोरोनाचा विषाणू काही जगावेगळा आहे का? सगळेजण इतके का घाबरलेत?’’ अज्ञानात सुख असतं, असा एक विचार आईच्या मनाला चाटून गेला. तो झटकत ती म्हणाली. ‘‘अगं जाई, हा जगावेगळा अजिबात नाही. आपल्याला सर्दी होते किंवा श्वसनसंस्थेला सूज ज्या विषाणूंमुळे होते, त्या विषाणूंच्या गटातीलच हा एक विषाणू आहे.’’

‘‘मग, आत्ता त्याच्यावर एवढी चर्चा का होतेय आई?’’

‘‘जाई बेटा, साथ आल्यामुळे त्याचा शोध आपल्याला आत्ता लागला आहे. त्याचं नाव आहे COVID -19 (Corona Virus Disease -2019)’’.

‘‘हा खूप भयंकर, जीवघेणा आहे का?’’ जाईच्या शंकेचं निरसन करण्याकरिता आई म्हणाली, ‘‘खरं सांगायचं, तर बऱ्याच लोकांना याचा संसर्ग झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. किंवा त्यांना काही त्रासही होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वत: हून बरे होतात. १५% रुग्णांमध्ये हा रोग गंभीर रूप धारण करतो आणि १ ते २% लोक आपला जीव गमावतात.’’

‘‘या रोगाची नेमकी लक्षणं कोणती आहेत?’’

‘‘ताप, कोरडा खोकला आणि थकवा अशी सुरुवात होते. काही जणांना अंग दुखणे, नाक चोंदणे किंवा नाक गळायला लागणे, घसा दुखणे.. अशी लक्षणं जाणवतात. काहींना डायरियापण होतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, तरुण आहेत असे रुग्ण औषध न घेताच बरे होतात.’’

‘‘आई, आलं माझ्या लक्षात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना याचा जास्त त्रास होणार आहे?’’

‘‘अगदी बरोब्बर जाई. त्यामुळे साधारण वृद्ध माणसांमध्ये हा रोग गंभीर स्वरूप धारण करतो. श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो, संसर्ग फुप्फुसापर्यंत पोहोचतो, न्यूमोनियाही होऊ शकतो. असे रुग्ण जीव गमावतात.’’

‘‘मग आई, याच्यावर काही औषधं नाहीत का?’’- इति जाई.

‘‘जाई बेटा, जिवाणूंमुळे संसर्ग झाला, तर प्रतिजैविकं (Antibiotics) वापरता येतात. पण विषाणूंच्या बाबतीत प्रतिजैविकं निरुपयोगी ठरतात. यावर एखादं विशिष्ट औषध (Antiviral Medicine) किंवा लस (Vaccine) तयार झालेली नाही. संशोधन चालू आहे.’’

‘‘हल्ली सगळ्या जाहिरातींत सांगतात, साबण लावून हात धुवा, ते कशाकरिता?’’

‘‘अगदी मुद्दय़ाचं विचारलंस बघ! तुला काय सांगितलं मी? या रोगाचं मुख्य लक्षण सर्दी किंवा खोकला. त्यामुळे शिंकताना किंवा खोकताना जो फवारा उडतो, त्या सूक्ष्म थेंबात हे जिवाणू असतात. हे जवळपासच्या वस्तूंवर जाऊन बसतात. त्या वस्तूला दुसऱ्या माणसाने हात लावला आणि तो हात त्याने आपल्या चेहऱ्याला, डोळ्यांना किंवा नाकाला लावला, तर तो विषाणू त्या माणसाच्या शरीरात शिरतो.’’ आई पुढचं सांगायला थांबली, पण जाई अधीरतेने म्हणाली, ‘‘हात धुतल्यामुळे काय होतं?’’

‘‘साबण लावून चांगले २० सेकंद हात खसखसून स्वच्छ धुवायचे किंवा ज्यात अल्कोहोल आहे असं हँड सॅनिटायझर हाताला लावायचं म्हणजे हा विषाणू मरतो.’’

जाई म्हणाली, ‘‘मी एक सांगते, खोकताना किंवा शिंकताना, संसर्ग झाला असो की नसो, रुमाल धरायचा किंवा टिश्यू पेपर, म्हणजे फवारा उडून संसर्ग पसरणार नाही. टिश्यू पेपर लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकायचा. हो ना!’’

‘‘चांगलंच समजलं तुला. आता लक्षात ठेवायचं एकच- बाहेरून कुठूनही आलं की साबणाने हात चांगले चोळून चोळून धुवायचे. हात धुण्याआधी चेहऱ्याला कुठे स्पर्श करायचा नाही!’’

‘‘जाई बेटा, दोन ओळी सुचल्या. ऐक..

साबणाने हात धुवा वारंवार

विषाणूला पळवून लावू अटकेपार.’’

‘‘वा, मस्तच! चल, आता मी खेळायला जाते,’’ असं म्हणत जाई धावत बाहेर पडली.