अपूर्वची नवीन बुटांची खरेदी अगदी मनासारखी झाली होती. सगळ्यांना बूट दाखवून झाले होते. थोड्या थोड्या वेळाने त्याला बुटांची आठवण यायची. रॅकमधून ते काढायचे-घालायचे, माना वळवून वळवून त्यांच्याकडे बघायचे… यात स्वारी अगदी रमून जात होती. ‘‘पाऊस नसला तरी मी पहिल्या दिवशी शाळेत जाताना ते घालून जाणार म्हणजे जाणार,’’ असं जाहीर करणंही चालू होतं. नेमका पाऊसही शाळेत जायच्या वेळी आलाच नाही. त्यामुळे शाळेतून आल्या आल्या, शाळेतील गमती न सांगता अपूर्वने आजीजवळ तक्रारीचा सूर लावला.
‘‘आजी, असा कसा गं हा पाऊस? तू म्हणाली होतीस ना की सकाळपासून मळभ आलंय. सूर्यदर्शन झालेलंच नाही. पावसाची सर येईल असं वाटतंय म्हणून. मग तो आला का नाही? माझ्या बुटांनाही भिजायचं होतं ना!’’ निरागस अपूर्वने नाराजी व्यक्त केली.
‘‘अरे निसर्गराजा आहे तो. त्याच्या मर्जीनेच तो येणार. हवामान खात्याचा आग्रह तो जुमानत नाही. बघता बघता यूटर्न घेतो आणि सूर्यदेवांना पाठवून देतो इकडे.’’ आजीने हसून समजूत घातली.
‘‘खरंच गं आजी… एकदा मला जायचं होतं मैत्रिणीकडे तिच्या बर्थ डे पार्टीला. मस्त तयार झाले होते मी. पावसाची जराही चिन्हं नव्हती. पण क्षणार्धात वारा सुटला. खिडक्या आपटायला लागल्या. वस्तू उडायला लागल्या. वाळलेले कपडे खाली पडू लागले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत हलायला लागल्या. विजा चमकू लागल्या. केवढा आवाज होत होता. अगदी ढोल बडवतात ना तसंच मला वाटलं.’’ नूपुर पावसाच्या त्या आठवणीत भिजून गेली.
‘‘वेगवेगळे आवाज काढणं ही त्याची खासियत आहे. संगीतकारच आहे तो. छत्रीवर, छतावर, गच्चीवर, उतरत्या पत्र्यावर कधी संथपणे कधी जोरात, असा आपटतो की जणू तबलाच वाजायला लागतो. समेवर आल्यासारखी जोरदार थाप देतो. त्याच्या आवेगानुसार काळी १, २, ३, ४, ५ मन मानेल तशी पट्टी लावतो. सरींच्या निमुळत्या बोटांनी एकताल, निताल, दादरा, झपताल वाजवत सुटतो. लय बदलत राहतो. त्याच्या आवाजाकडे कान देण्यात मजा वाटते ना…’’ आजी पावसात अडकली. नूपुरच्या डोळ्यात कुतूहल दाटून आलं.
‘‘आजी, मी थबक थबक वाजवतो गं.’’ अपूर्वने नकळत ताल धरला.
‘‘मग मस्त कारंजे उडतात आणि आईकडून धम्मक लाडू मिळतात ना!’’ नूपुरने अपूर्वला थोडं चिडवलंच.
‘‘आजी, कधी कधी पाऊस शांतपणे पडत राहतो. हळूहळू त्याची पट्टी वाढते. मंद्र, मध्य आणि तार सप्तक यात तो धावपळ करत राहतो.’’ शास्त्रीय गायन शिकणारी नंदिनी आवाजातले चढउतार बरोबर टिपू शकत होती. तिची बोटं जणू सतत हार्मोनियमवर फिरत होती.
‘‘कधी कधी मला पाऊस पडताना दिसतो, पण आवाजच येत नाही. तानपुऱ्याच्या तारा छेडाव्यात त्याप्रमाणे अगदी मंद सुरावट असते. जणू तो पार्श्वसंगीतच लावतो.’’ नूपुरचे निरीक्षण.
‘‘आणि जलतरंग उमटतात, वादन रंगतं, ते पाहिलंत की नाही? छोट्या छोट्या साचलेल्या पाण्यात सर कोसळते, चिमुकला कारंजा उडतो. नादवर्तुळं निर्माण होतात. मोठी मोठी होत जातात. अशी अनेक वर्तुळं एकमेकांना स्पर्श करत विरत जातात. किती छान वाटतं बघताना आणि नाजूक नादमयता ऐकताना. मन एकाग्र होतं. कसं वाटतंय ऐकताना… तुमच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला थोडं खाद्या पुरवते गं.’’ इति आजी.
‘‘आजी, कधी कधी पाऊस आणि वारा पकडापकडी खेळायला लागतात. वारा अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र पावसाची सर जराही ऐकत नाही. खाली येत आनंदाने धप्पदिशी उडी मारते. वेगवेगळे लहान-मोठे ‘नाद’ निर्माण होतात. एकमेकांत गुफले जातात. जणू वेगवेगळी वाद्यां वाजवावीत ना तसं वाटतं बघ. पावसाचा ऑर्केस्ट्राच सुरू होतो.’’ नंदिनी नकळत ताल धरते.
मला बाल्कनीतून पाऊस बघायला फार आवडतो. किती झाडं आहेत आपल्याकडे. अगदी फांद्या हाताला लागतात. झाडावर पाऊस पडतो ना तेव्हा थेंबाथेंबाने फांदीवर पडतो. तिथून पानावर उडी मारतो. पान खाली झुकून थेंबाला फुलाकडे पाठवते. टपटप आवाज हलके हलके होत राहतो. छोटी मोठी तालवाद्यां वाजत राहतात.’’ नूपुरची तंद्री लागते.
‘‘मीपण बाल्कनीतून हात लांब करत पावसाला पकडतो.’’ अपूर्वने मोठ्या ऐटीत सांगितलं. केवढा आणि किती वेगवेगळ्या प्रकारचा असतो, खरं ना! सात सुरांशी खेळणारा संगीतकारच आहे तो. त्याचं ‘जीवन’दायी संगीत आपल्याला फार आवडतं. म्हणून तर त्याची आपण वाट बघत असतो. अरे, पाऊस आला वाटतं. तरीच वातावरणात गारवा आलाय.’’ – आजी गॅलरीतून वाकून पाहत म्हणाली.
‘‘मी पावसात खेळायला चाललो नवीन बूट घालून,’’ असं म्हणत अपूर्व सुसाट पळत सुटला.
suchitrasathe52 @gmail. com