आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. सुबोध आणि चिन्मय हे दोघे एकाच शाळेतील, एकाच वर्गातील विद्यार्थी आमने-सामने आले होते. ही स्पर्धा गेली तीन वर्षं सलग जिंकण्याचा विक्रम सुबोधपाशी होता, तर चिन्मय वडिलांची बदली झाल्यामुळे या शाळेत नवीनच आलेला. दोघेही खेळाडू तुल्यबळ, त्यामुळे सामना अटीतटीचा होता. खेळ बघायला शिक्षकांसह मुलांची ही गर्दी जमलेली! इतक्यात, बहुधा दडपणामुळे असेल, सुबोधची एक चाल चुकली आणि चिन्मयनं त्याचा फायदा उठवत डाव जिंकला. सुबोधचा चेहरा पडला. चिन्मयचं कसंबसं अभिनंदन करून, कोणाशीही न बोलता तो तिथून तडक बाहेर पडला. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आत्तापर्यंत केवळ बुद्धिबळातच नव्हे तर अन्य खेळांत आणि अभ्यासातही त्याचा हात धरणारं वर्गात कोणीही नव्हतं. पण या वर्षापासून म्हणजे नववीत आल्यापासून चित्र थोडं बदललं होतं.

याचं कारण तोच होता- चिन्मय… शाळेत नव्यानेच आलेला चिन्मय खेळणे, पोहणे, अभ्यास अशा सर्वच गोष्टींत वरचढ होता. परिणामी सुबोधच्या अनभिषिक्त साम्राज्याला बसलेला हादरा सहन करणं त्याच्या आवाक्या बाहेर गेलं होतं आणि आज तर त्याच्या दुय्यमतेवर ठळक शिक्का बसला होता.
घरी आल्यावर त्याचा उतरलेला चेहरा पाहून आईनं काय झालं ते ओळखलं. ती म्हणाली, ‘‘बाळा खेळात हार- जीत व्हायचीच. त्याशिवाय प्रगती कशी होणार? आता तू दुप्पट सराव कर आणि पुढील वर्षी आत्मविश्वासाने सामोरा जा.’’

‘‘त्याचा काही उपयोग नाही. त्याचे वडील कलेक्टर आहेत ना, म्हणून सगळ्यांनी त्याला डोक्यावर चढवून ठेवलंय. पण एक दिवस त्याला अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही.’’ सुबोधचा त्रागा बाहेर पडला.

‘‘अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही की घडवल्याशिवाय राहणार नाही ?’’ आई थोडं थांबून ती पुढे म्हणाली, ‘‘चिन्मय, आल्यापासून मी बघतेय तुम्ही मित्र त्याचा द्वेष करता, त्याला तुम्ही वर्गात एकटं पाडलंय. डबाही तो एकटाच खातो. मधल्या सुट्टीत कोणी त्याला खेळायला घेत नाही, शाळेत जाता-येतानाही त्याला कोणी सोबत करत नाही. खरं ना?’’

‘‘तुला हे सगळं कोणी सांगितलं ?’’

‘‘अरे तुझे मित्र घरी येतात तेव्हा तुमच्या गप्पांतूनच मी हे ऐकलं. पण म्हटलं, संधी मिळेल तेव्हा बोलू. राजा, मी जे सांगणार आहे ते शांतपणे ऐकशील ?’’
‘‘तू त्याचेच पोवाडे गाणार असशील…’’

‘‘हाच दृष्टिकोन ठेवून ऐकणार असशील तर मी गप्पच राहते.’’

‘‘बरं बरं सॉरी, सांग तर खरं!’’

आई त्याच्या जवळ जाऊन त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ‘‘बाळा, आमचे गुरू सांगतात की, जेव्हा आपण दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो, त्याच्याप्रती ईर्ष्या बाळगतो तेव्हा आपल्यातील गुण हळूहळू आपल्याला सोडून जाऊ लागतात. सद्गुण ही दैवी संपत्ती आहे. ती नकारात्मक शरीरात राहत नाही. या उलट तुम्ही एखाद्याच्या गुणांचा मनापासून आदर केलात, प्रशंसा केलीत तर ते गुण तुमच्यात संक्रमित होऊ लागतात. मी याचा अनुभव घेतलाय. तू प्रयत्न करून बघशील?’’

सुबोध विचारात पडला. त्याला आपल्या वागण्यातील चुका दिसू लागल्या. आईला मिठी मारत तो म्हणाला, ‘‘आई मी चुकलो, उद्यापासून तू सांगितल्याप्रमाणे वागण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.’’

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच सुबोध चिन्मयजवळ गेला, म्हणाला, ‘‘आजपासून मी तुझ्या शेजारी बसणार. डबाही आपण एकत्र खायचा. घरी जातानाही सोबत जायचं.’’

चिन्मयच नव्हे तर बाकीचे मित्रही त्याच्याकडे बघतच राहिले. पण सुबोधचा निश्चय पक्का होता. मन स्वच्छ केल्यानं चिन्मयचा वक्तशीरपणा, नम्र बोलणं, प्रत्येक विषय खोलात जाऊन समजून घेण्याची वृत्ती हे गुण त्याला नव्यानं कळले. तो ते आत्मसात करू लागला.’’

हां हां म्हणता वर्ष सरलं. नववीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालाचा दिवस उजाडला. हसतमुखानं उड्या मारत घरी येणाऱ्या सुबोधला बघून आई म्हणाली, ‘‘यावेळीही बाजी मारली वाटतं!’’

‘‘हो, पण मी नाही चिन्मयनं. माझा नंबर दुसरा आला.’’

आई आश्चर्यानं बघतच राहिली. तिनं सुबोधला पटकन जवळ घेतलं. म्हणाली, ‘‘बाळा, तू दुसरा नाहीस तर पहिला आला आहेस. जीवनाच्या परीक्षेत तू प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहेस. मनातील ईर्ष्येवर तू प्रयत्नपूर्वक विजय मिळवला आहेस, आता तुला कोणीही हरवू शकत नाही.’’

waglesampada@gmail.com