इंटरनेटवर माहितीचा प्रचंड खजिना उपलब्ध आहे. आणि ही माहिती आपल्याला संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनद्वारे क्षणात उपलब्ध होऊ  शकते. अतिशय मनोरंजक पद्धतीने ज्ञान देणाऱ्या खूप साइट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आज आपण त्यापैकी बुद्धीला चालना देणाऱ्या कोडय़ांची साइट  पाहणार आहोत. ही कोडी तुम्हाला इंटरअ‍ॅक्टिव्ह पद्धतीने सोडवता येतात. आता सोबत दिलेले कोडे पाहा.
एका कुटुंबातील पाच माणसे रात्रीच्या अंधारात नदीकाठी आली. त्यांना नदीवरचा अरुंद पूल ओलांडून नदीच्या दुसऱ्या काठावर जायचे आहे. पुलावरून एका वेळी दोनच माणसे जाऊ  शकतात. त्यांच्याजवळ एकच कंदील आहे. पूल ओलांडताना हा कंदील सोबत असावाच लागणार आहे. त्यात केवळ ३० मिनिटे चालेल एवढेच इंधन आहे. प्रत्येक व्यक्तीला तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा आहे.
‘अ’ ला १ मिनिट,  ‘इ’ ला ३ मिनिटे,  ‘उ’ ला ६ मिनिटे,  ‘ऊ ’ला ८ मिनिटे,  ‘ए’ ला १२ मिनिटे.
दोन व्यक्तींना पूल ओलांडत असताना त्यांना एकत्रच- म्हणजे जास्त वेळ लागणाऱ्या व्यक्तींच्या गतीने जावे लागेल. ३० मिनिटाच्या अवधीत ही सर्व माणसे दुसऱ्या काठावर पोहोचू शकतील का?
आहे ना हे गणित मनोरंजक? जर तुम्हाला हे अ‍ॅनिमेटेड- म्हणजेच दृश्य स्वरूपात संगणकावर किंवा स्मार्ट फोनवर सोडवायला मिळालं तर?  http://coolmath4kids.com/math_puzzles/  साइटवर हे आणि इतरही विविध प्रकारची कोडी उत्तरांसहित उपलब्ध आहेत. तुमच्या तर्कबुद्धीला उत्तम खाद्य पुरवणारी ही साइट आहे. ही साइट लहान मुले आणि मोठय़ा माणसांनाही आवडेल यात शंकाच नाही. बघा तुम्हाला सोडवता येतात का ही कोडी? तुम्हाला ही साइट कशी वाटली ते जरूर कळवा. (सोबत या साइटचा दफ कोडही दिला आहे. स्मार्ट फोनद्वारे हा स्कॅन करूनही तुम्ही साइटवर पटकन पोहोचू शकता.)
वर दिलेल्या कोडय़ाचे उत्तर खाली दिले आहे. तुम्ही असेच सोडवले का ते तपासून बघा.
उत्तर- पहिल्या फेरीत ‘अ’ आणि इ (३ मिनिटे व १ मिनिट असा वेळ लागणाऱ्या व्यक्ती) दुसऱ्या काठावर जातील. (१ मिनिट वेळ लागणारी व्यक्ती) ‘अ’ एकटा परत येईल. चार मिनिटे संपली आहेत.
नंतर (६ मिनिटे  व १ मिनीट  असा वेळ लागणाऱ्या व्यक्ती) ‘अ’ आणि ‘उ’ दुसऱ्या काठावर जातील. (१ मिनिट वेळ लागणारी व्यक्ती परत येईल.) ‘अ’ एकटा परत येईल. एकूण ११ मिनिटे संपली आहेत.
नंतर (८ मिनिटे  व १२  मिनिटे असा वेळ लागणाऱ्या व्यक्ती) ‘ऊ ’
आणि ‘ए’ दुसऱ्या काठावर जातील. (३ मिनिटे वेळ लागणारी व्यक्ती परत येईल.) या वेळी ‘इ’ एकटा परत येईल. २६ मिनिटे संपली आहेत.
शेवटी ३ मिनिटे व १ मिनिट असा वेळ लागणाऱ्या व्यक्ती पूल ओलांडतील. ३० मिनिटांत सर्वानी पूल ओलांडला आहे.                
-मनाली रानडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crosswords that provides feeding to brain
First published on: 25-01-2015 at 01:03 IST