भारती भावसार – bharati.bhawasar@gmail.com
एके दिवशी सकाळी शेरा कुत्रा उठला. पाठीचा धनुष्य करत त्याने आळस दिला. त्याचे मित्र चंकू आणि मंकू कुठे दिसतायत ते पाहायला तो जिन्यावरून खाली उतरला. रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता. खरं तर यावेळी गाडय़ांची गर्दी रस्त्यावर असते. मुलांच्या आया आणि पाठीवर दप्तरांचे ओझे सांभाळत धावणारी चिमुरडी मुले रस्ता ओलांडून त्यांची शाळेची बस गाठण्याच्या गडबडीत असतात. पण आज फारशी वर्दळ दिसत नव्हती. असेच एक-दोन दिवस गेले. माणसे रस्त्यावरच काय, घराबाहेरच पडायची कमी झाली होती.
शेरा ज्या इमारतीच्या जिन्याखाली राहत होता, तिथली माणसेही सारखी पिशव्यांतून भरपूर सामान घेऊन जाताना दिसू लागली. तोंडाला कसलेसे फडके लावूनच ती घराबाहेर पडताना दिसू लागली. रस्ते मोकळे असल्याने दिवसभर इकडे तिकडे भटकायला चंकू आणि मंकूला मनसोक्त आनंद मिळू लागला.
पण हे काहीतरी वेगळेच घडते आहे असा संशय शेराला येऊ लागला. आता त्याला जिन्याखाली आयते जेवण मिळेनासे झाले. नेहमी जेवण देणाऱ्या काकू जिन्याकडे फिरकेनाशा झाल्या. अन्न शोधण्यासाठी शेरालाही बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या चंकू-मंकूप्रमाणे कचऱ्याच्या ढिगाजवळ जावे लागत होते. एकदा तर इमारतीतल्या एका काकांनी शेराला जिन्याखालून हाकलूनही दिले.
असाच एके दिवशी शेरा उठला आणि आळस घालवण्यासाठी रस्त्यावर फिरू लागला. जरा लांब फेरफटका मारायचा विचार त्याच्या डोक्यात आला म्हणून त्याची नेहमीची हद्द ओलांडून तो शेजारच्या कॉलनीमध्ये शिरला. कॉलनीच्या मधोमध असलेले मैदान ओस पडले होते. ‘अहाहा.. किती छान!’ असे म्हणत शेराने तेथील मातीत चांगले लोळून घेतले. थोडे ऊन चढले म्हणून मग तो परत त्याच्या घराकडे आला. आपले छोटे दोस्त चंकू आणि मंकूला केव्हा एकदा ही मज्जा सांगतो असे शेराला झाले होते.
इतक्यात चंकू-मंकू समोरून येताना दिसले. शेराने त्यांना घाईघाईने गाठले आणि शेपटी हलवून त्याने त्याच्या मागे मागे येण्याचा इशारा केला. इमारतीची हद्द ओलांडून बरेच पुढे गेल्यावर शेजारच्या कॉलनीतील मोकळ्या मैदानावर शेरा त्यांना घेऊन गेला. तेथे असलेली लाल माती पाहून चंकू-मंकूनीही धूम ठोकली. ते तिघेही मातीत गडाबडा लोळले आणि भरपूर खेळले.
मातीत भरपूर खेळून झाल्यावर चंकू-मंकूने शेराचे आभार मानले. चंकू थोडा हुशार होता. त्याने शेराला विचारले, ‘शेरा, तू इतके दिवस आम्हाला इकडे का बरे आणले नाहीस? काय मस्त जागा आहे.’ शेरा म्हणाला, ‘खरे तर रस्त्यावर माणसांची गर्दी कमी झाल्याने खूप मोकळे मोकळे आणि छान वाटतेय. त्यामुळे आपली इमारत आणि परिसर सोडून कुठेतरी जावेसे वाटले.’ पण तितक्यात त्याला आठवले की तो चंकू-मंकूच्या वयाचा असताना येथे येत असे. सकाळ-संध्याकाळ इथे मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची गर्दी असे आणि मैदानाबाहेर गोलाकार धावणारी माणसे एरवी दिसत. यामुळे येथे येणे त्याने कमी केले होते. मात्र खरे तर रॉकी कुत्रा आणि त्याच्या सवंगडय़ांची ती हद्द होती. इथे बाहेरून आलेल्या कुत्र्यांना ते भुंकून भुंकून पळवून लावत असत. आपल्या हद्दीबाहेर जाईपर्यंत रॉकीचे इतर दोस्त बाहेरून आलेल्या त्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला पळवून लावत. म्हणून शेराने येथे येणे सोडले होते.
पण गेल्या काही दिवसांत इथे रॉकी आणि इतर कुत्रे काही शेराला दिसले नव्हते. चंकू-मंकूला शेरा म्हणाला, ‘रॉकी नावाचा कुत्रा येथे बाहेरून कुणाला येऊ देत नसे, म्हणून मी येथे येणे सोडले होते. पण गेल्या काही दिवसांपासून रॉकी इथे दिसलेलाच नाही. त्याला शोधूयात का?’
चंकू-मंकूला शेराचे बोलणे फारसे पटले नव्हते, पण या निमित्ताने नवीन जागी फिरता येईल म्हणून ते शेराच्या मागे चालू लागले. कॉलनीतले बरेच रस्ते पालथे घातल्यानंतर एका गल्लीत रॉकी व दोन कुत्रे शून्यात नजर लावलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. त्यांना पाहून शेरा थोडा सावध झाला आणि हळूहळू त्यांच्या जवळ जात त्याने त्यांचा अंदाज घेतला. पण रॉकी आणि त्याचे दोस्त काही भुंकण्याच्या वा हल्ला करण्याच्या तयारीत नसल्याची खात्री झाल्यावर शेरा त्याला म्हणाला, ‘रॉकी, तू मैदानाजवळ दिसला नाहीस बरेच दिवस? तुमची जागा बदलली आहे का?’
रॉकीने अंग जवळ करून कसेबसे सांगितले, ‘काही दिवसांपासून या कॉलनीतील माणसे आम्हाला सारखी मारून लांब पिटाळताहेत. इकडच्या कचराकुंडय़ाही त्यांनी हटवल्या आहेत. दोन- दोन दिवस खायला अन्न मिळत नाही. त्यामुळे मग भुंकायला जोर तरी कुठून येणार? आम्हाला एरवी जेवण देणारी दोन कुटुंबे होती. ती आपापसात बोलत होती.. कोणतासा लॉकडाऊन सुरू झाला आहे. करोना नावाचा आजार पसरत असल्याने माणसे प्राण्यांनाही दूर हाकलू लागली आहेत. म्हणून आमची अशी दशा झाली आहे.’
शेराची आता टय़ूब पेटली. त्यालाही इमारतीमधली माणसे का हाकलून देतात, हे त्याला आत्ता कळले. त्याने लगेच रॉकीकडे मैत्रीचा हात पुढे केला. सुदैवाने त्यांच्या इमारतीजवळची कचराकुंडी अजून होती. तेथे आपल्या सगळ्यांची खाण्याची सोय होऊ शकेल असे शेरा म्हणाला. ते ऐकताच भुकेने खोल गेलेले रॉकी आणि त्याच्या साथीदारांचे डोळे आनंदाने चमकू लागले. शेराने इशारा करताच त्याच्या मागे सगळेजण निघाले. कचराकुंडीतल्या अन्नावर साऱ्यांनी ताव मारला. बऱ्याच दिवसांनी रॉकी पोटभर जेवला. लॉकडाऊनमुळे कितीही हाल झाले असले तरी आता शेराच्या रूपाने आपल्याला एक नवा मित्र मिळाल्याचा त्याला आनंद झाला.
आणि मग कॉलनीत रोज माणसांची नाही, तर कुत्र्यांची गर्दी होऊ लागली..