सुमनआजीला झाडा-फुलांची खूप आवड होती. घराभोवतीची छोटी बाग बाराही महिने हिरवीगार आणि फळा-फुलांनी बहरलेली असे. आजीचा नातू- पिलू आणि दोस्त कंपनीकरता खेळायला ती हक्काची जागा होती. आजीच्या शिकवणीमुळे या दोस्तांची झाडांबरोबर मैत्रीच जुळली होती. दुपारी शाळा सुटल्यावर आजीबरोबर ही सगळी छोटी मंडळी गवत काढणे, पाणी घालणे अशी मदत मोठय़ा उत्साहाने करत असायचे.
श्रावण महिन्यात पावसाच्या पाण्याने बाग हिरवीगार झाली होती. फुलझाडे व वेली- फुलांनी बहरली होती. जाई, जुई, चमेली, कुंदा वेलीवर फुलू लागल्या. प्राजक्ताचे झाड फुलांमुळे चांदण्या लावल्यासारखे सुंदर दिसत होते.
बागेतील इतकी फुले बघून सुमनआजीला घराशेजारील मंदिरातील महादेवाला श्रावणात एक लक्ष फुले वाहायची इच्छा झाली. त्याप्रमाणे श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुमनआजी पहाटेच उठली. आंघोळ करून प्रसन्न मनाने परडी घेऊन फुले काढायला बागेत आली. पण जाई, जुई, चमेली, कुंदा सगळ्याच वेली उंच चढल्या होत्या. आजीच्या हाताला एकही फूल लागेना. प्राजक्ताच्या फुलांनी बहरलेले झाडही उंच वाढले होते. त्याचीही फुले आजीला काढता येण्यासारखी नव्हती आणि महादेवाला वाहण्यासाठी तर पांढरीशुभ्र व सुगंधी फुलेच हवी होती.
आजी मनातून खूप नाराज झाली. तेव्हा वेलीवरची फुले हसून एकमेकांना खुणावून आजीच्या फजितीला हसू लागले. वाऱ्याच्या झोक्यावर डोलत आजीची फजिती बघू लागले. पण प्राजक्ताच्या झाडाला खूप वाईट वाटलं. त्याला आठवलं, ते अगदी छोटं रोप असताना आजीनं खूप काळजी घेऊन झाडाला वाढवलं होतं. त्याच्याभोवती आळे केले होते. उन्हाळ्यात पाय, कंबर दुखत असतानाही पिलूच्या मदतीने पाणी घालून झाडाला वाचवलं होतं.
ते सगळं आठवून प्राजक्ताने जाई, जुई, चमेली, कुंदा सगळ्यांना हाका मारल्या. त्यांना सांगितलं, ‘आपण काहीतरी मदत करायला हवी. आजीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजीला मदत केली पाहिजे. कारण सुमनआजीनं आपली खूप काळजी घेऊन आपल्याला जपलं, वाढवलं.’ पण प्राजक्ताचं कोणीच  ऐकलं नाही. ते त्याच्या वेडेपणाला हसू लागले. तेव्हा प्राजक्तानं विचार केला की, आपणच आजीला मदत करायची. आजी नाराज होऊन मंदिरात महादेवाला नमस्कार करायला निघाल्या होत्या. त्या प्राजक्ताच्या झाडाखाली आल्या आणि अचानक झाडावरील नुकत्याच उमललेल्या टपोऱ्या फुलांचा सडा खाली पडू लागला. आजींना एकदम सुखद धक्का बसला. त्यांनी झाडाकडे  पाहिलं. झाड समाधानानं डोलत होतं.
सुमनआजींनी भराभर ती टपोरी, ताजी, पांढरीशुभ्र फुले परडीत हळू हातानं वेचून घेतली आणि समाधानानं त्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर एक-एक फूल वाहिले. असं रोज होऊ लागलं. महादेवाचा मंदिरातील गाभारा ताज्या फुलांच्या सुगंधानं भरून जाऊ लागला.
बाकीची वेलीवरची फुलं मात्र प्राजक्ताला वेडय़ात काढत होती, पण प्राजक्तानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आजींचा एक लक्ष फुलं वाहायचा संकल्प पूर्णत्वास गेला. त्यांनी समाधानाने देवाला नमस्कार केला आणि डोळे उघडून बघितले तर इवल्याशा नाजूक प्राजक्ताच्या फुलांचे देठ मोहक केसरी रंगात रंगलेले होते. त्यामुळे ती फुले खूपच सुंदर दिसत होती. देवाने त्या फुलांना त्यांच्या निरपेक्ष त्यागाकरता इतके सुंदर बक्षीस दिले होते.
तेव्हापासून प्राजक्त फुलला की सकाळी ताज्या टपोऱ्या, केशरी दांडय़ा असलेल्या फुलांचा सडा झाडाखाली पडलेला आपल्याला दिसतो.