आपण भारतीयांचा सर्वात लाडका खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळाला आपल्या मराठी ‘करां’चे योगदान आज या कोडय़ाद्वारे पाहणार आहोत. ज्या मानकऱ्यांच्या आडनावात शेवटी ‘कर’ येतो, असे क्रिकेटमधील काही मान्यवर आपल्या या कोडय़ाचा भाग झाले आहेत.
१)  याचा खेळ पाहून क्रिकेटचे भीष्माचार्य खुद्द डॉन ब्रॅडमन यांना स्वत:च्या खेळाची आठवण आली असे हे भारताचे रत्न.
२)  कर्नल नावाने ओळखला जाणारा भारताचा कप्तान. क्रिकेटचे माहेरघर समजले जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर तीन कसोटी शतके झळकावणारा परदेशी (इंग्लंडचा नसलेला) खेळाडू.
३) कमीत कमी एकदिवशीय (२३ ODI) सामन्यांमध्ये पन्नास विकेट घेण्याचा त्याचा विक्रम जवळ जवळ दहा वर्षे अबाधित होता.
४) सलामीचा फलंदाज म्हणून ख्यातनाम असलेला हा विक्रमवीर.
५) याच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिका जिंकली.
६) फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहून अप्रतिम झेल घेण्याचे कसब असलेला नावाजलेला क्षेत्ररक्षक.
७) तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून योगदान दिलेले, भारताच्या फलंदाजीचा कणा मानले गेलेले हे पिता-पुत्र.
८) १९४०-५० या दशकात भारताचे प्रतिनिधित्व केलेला मध्यमगती गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू.
९)  क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंना घडवणारे द्रोणाचार्य.
१०) उमेदीचा कालखंड दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास आल्याने थोडय़ाच कसोटीत खेळला असला तरी एक तडाखेबंद फलंदाज म्हणून या खेळाडूचा दबदबा होता.
११) सातत्याने दोन दशकांच्यावर मुंबई संघातून फिरकी गोलंदाजी करणारा हा खेळाडू. संघाला अनेक वेळा रणजी करंडक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या या उत्कृष्ट फिरकीपटूला एकही कसोटी सामना मात्र खेळायला मिळाला नाही, हे त्याचे दुर्दैव.
१२)  रणजी करंडक सामन्यातील नाबाद ४४३ धावांचा उच्चांक या खेळाडूच्या नावावर आहे. प्रथम दर्जाच्या सामन्यातील चारशेहून धावा काढणारा हा एकमेव भारतीय फलंदाज (यापेक्षा जास्त धावा काढणारे जागतिक क्रिकेटच्या इतिहासात फक्त तीन फलंदाज आहेत- ब्रॅडमन, हनिफ महमंद, ब्रायन लारा.) असे असूनही या फलंदाजाने एकही कसोटी खेळलेली नाही.     

उत्तरे :
१) सचिन तेंडुलकर २) दिलीप वेंगसरकर
 ३) अजित आगरकर ४) सुनील गावसकर ५) अजित वाडेकर ६)  एकनाथ सोलकर
७) विजय-संजय मांजरेकर ८) दत्तू फडकर ९) रमाकांत आचरेकर १०) खंडू रांगणेकर
 ११)  पद्माकर शिवलकर
 १२)  भाऊसाहेब निंबाळकर.